breaking-newsTOP Newsपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

माजी आमदार विलास लांडे यांना शिरुरची उमेदवारी द्या : शहराध्यक्ष अजित गव्हाणे 

मोशीतील कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

पिंपरी : शिरुर लोकसभा मतदार संघातून माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी द्यावी. पिंपरी-चिंचवडमधून आम्ही सर्वजण त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतो, अशी जाहीर मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. 

मोशी येथील पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच झाला. यावेळी  महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, युवक शहराध्यक्ष शेखर काटे आदी उपस्थित होते. 

अजित गव्हाणे म्हणाले की, हवेली विधानसभा मतदार संघातून पक्षाचे आमदार म्हणून सुरूवातीला निवडून आलेले माजी आमदार विलास लांडे यांनी विविध विकासकामांसाठी पुढाकार घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये त्यांनी योगदान दिले आहे. त्यांना शिरुर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिल्यास पिंपरी-चिंचवडसह भोसरीतून मोठे मताधिक्य आम्ही देवू. त्यासाठी सर्वजण एकोप्याने कामाला लागतो. त्यामुळे लांडे यांच्या उमेदवारीसाठी योग्य ते प्रयत्न करावेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात चाललंय काय? 

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी जाहीरपणे विलास लांडे यांच्या उमेदवारीची मागणी केली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये त्याबाबत कोणताही उल्लेख केला नाही. ‘‘विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मीच उमेदवारी दिली. पक्षात प्रवेश करुन घेतला. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली. खेड, मंचर, जुन्नर, हवेली चार तालुक्याची जबाबदारी दिलीप वळसे-पाटील यांना दिली. भोसरी, हडपसरची जबाबदारी आम्ही घेतली आणि डॉ. कोल्हे यांना निवडून आणले. दोन वर्षे होत नाहीत, तोच हा गडी राजीनामा देता म्हणाला. लोकांनी निवडून दिले, तर पाच वर्षे कामे तर केली पाहिजे.’’ अशी टीका नाव न घेता अजित पवार यांनी केली. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांच्या उमेदवारीबाबत केलेल्या मागणीकडे त्यांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून शिरुर मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अजित पवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात नेमका कोणता पत्ता बाहेर काढणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच, महायुतीच्या माध्यमातून जागावाटपामध्ये हा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार आहे. भाजपाच्या मदतीने या मतदार संघात अजित पवार यांचा उमेदवार निवडून येवू शकतो. त्यामुळे विलास लांडे महायुतीच्या उमेदवारीसाठी आग्रही राहतील, असे चित्र आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button