breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा भाजपाशी ‘‘सुसंवाद’’

  • नवी दिल्लीत घेतील केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट
  • खासदार कोल्हेंनी भाजपा प्रवेशाची भाकीते फेटाळली

पुणे । प्रतिनिधी
केंद्रात सत्तेत असलेल्या प्रभावशाली नेत्यांची भेट घेतली पाहिजे. राज्याची संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय ‘‘सुसंवाद’’ ठेवला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास देशपातळीवर आणखी अधोरेखित व्हावा, ‘‘शिवप्रताप गरुड झेप’’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग दिल्लीत घ्यावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी अमित शहांनी वेळ द्यावी, या करिता नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली, असा स्पष्ट दुजोरा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपाशी असलेला ‘सुसंवाद’ खासदार कोल्हे यांचे राजकीय सिमोल्लंघन ठरतो की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
खासदार अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरूड झेप’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील बारकावे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे, अशी अमोल कोल्हेंची भूमिका आहे. यासंदर्भात त्यांनी अमित शहांची भेट घेतली, असे सांगितले जात आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, हे वास्तव आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सत्तेत असलेल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. ‘सीबीएसई’च्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सविस्तर स्वरुपात नाही, अशी आपण खंत व्यक्त करतो. तसेच शिवनेरी किल्ल्यावर अजूनही महाराजांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज नाही, अशीही भूमिका मी संसदेत मांडली होती. या खंत व्यक्त करतो, तेव्हा त्या पूर्ण होण्यासाठी प्रभावशाली नेत्यांचं पाठबळ मिळाले, तर त्या नक्कीच पूर्ण होण्यासाठी मदत होऊ शकते.
**
अमोल कोल्हे भाजपाच्या वाटेवर…?
मध्यंतरी, केंद्रीय आदीवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाचा प्रवास दौरा केला. त्यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत ‘‘शिरुरचा खासदार भाजपाचा असेल’’ असा दावा केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत खासदार कोल्हे यांची जवळीक वाढलेली दिसते. विविध विकास कामांच्या माध्यमातून कोल्हे भाजपाच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आहेत. यापूर्वी, ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात डॉ. कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांचे पात्र साकारले होते. त्यामुळे कोल्हे यांची भाजपाशी जवळीक वाढल्याचे बोलले जात होते. दुसरीकडे, शिरुरमधून राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार निवडणूक लढवतील. कारण, शिरुरमधील सहापैकी पाच विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टया हा मतदार संघ पार्थ यांच्यासाठी सुरक्षित आहे, असे बोलले जाते. दुसरीकडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेच्या (शिंदे गट) माध्यमातून भाजपा- शिवसेना महायुतीच्या तिकीटावर दावा करणार आहेत. त्यामुळे संभाव्य राजकीय जोमीख लक्षात घेवून डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करतील आणि भाजपाच्या तिकीटावर आगामी निवडणूक लढवतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. मात्र, सध्यातरी खासदार कोल्हे यांनी सर्व राजकीय शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button