breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांचा एक महिन्याचा पगार देणार- अजित पवार

सांगली – राज्यात महापुराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर निघाले. मात्र हवामान खराब असल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची अजित पवार यांनी पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले की, पूरग्रस्तांच्या मदतीबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचेही यावेळी अजित पवारांनी जाहीर केले.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही आज सातारा जिल्ह्याचा दौरा करणार होते. मात्र कोयनानगरात खराब वातावरण आणि मुसळधार पाऊस असल्याने हेलिकॉप्टर उतरवण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांना पुण्याहून पुन्हा मुंबईला यावे लागले.

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यात शिराळा, वाळवासह अन्य दोन तालुक्यातील 18 सर्कलमध्ये 103 गावे पुराने बाधित झाले आहेत. राज्यात 2005 नंतर 2019 आणि आता 2021 मध्ये मोठा पूर आला आहे. अशी पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने बोटी लागतात. त्यामध्ये आता 80 बोटी आहेत. 1700 लाईव्ह जॅकेट पुरवण्यात आली आहेत. एनडीआरएफची दोन पथकं सांगलीत तैनात करण्यात आली आहेत. यातील एका पथकात 21 जवान आहेत. सांगलीतील चार तालुक्यात एकूण 110 जवान लोकांच्या मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले असून त्यांच्याकडे 3 बोटी आहेत. सांगलीत 24 ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. 2019 मध्ये 105 गावे बाधित झाली होती. तर 81 हजार कुटुंब बाधित झाली होती. आता 2021 मध्ये 103 गावे पूरामुळे बाधित झाली असून 41 हजार कुटुंबे बाधित झाली आहेत. तर आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सात जिल्ह्यांचा विचार करता सांगली, मिरज, कुपवाड हे महत्त्वाचे शहर बाधित झाल्यामुळे या शहरांतून मोठ्या प्रमाणात लोकांना स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना राहण्यासाठी 700 शासकीय छावण्या निर्माण करण्यात आल्या आहेत. तिथे सर्वांना जेवण वगैरे दिले जात असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागातील चीफ इंजिनिअर अधिकार्‍यांची टीम सात जिल्ह्यांत पाठवण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यांचे नुकसान, पूलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरड प्रवण गावं आणि पूर प्रवण गावं यामध्ये नेहमीचे असणारे दरड प्रवण गावं सोडून दुसर्‍याच गावांमध्ये दरड कोसळल्या आणि तिथे जास्त जीवितहानी झाली आहे. तळीये गावाला याचा मोठा फटका बसला आहे. सातार्‍यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठे नुकसान झाले आहे. सातार्‍यात बहुतांश भागात प्राणीहानी झाली आहे. तर मनुष्य हानी झालेली नाही. वायुदलाकडून जेवणाची पाकिटे वाटली जात आहेत. कोयना धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झाले. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. मात्र, यातून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या असल्याचे पवार म्हणाले.

सहा जिल्ह्यांत सध्या 64 जण बेपत्ता आहेत. रत्नागिरी 1200 तर ठाण्यात 1700 जण स्थलांतरित झालेले आहेत. 3248 जनावरे मृत झाली आहेत. तर 17300 कोेंबड्याही दगावल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पंचनामे पुर्ण झाले नसून नुकसानीचे आकडे बदलणार आहेत. जसेजसे पाणी ओसरत जाईल तसे नवीन नुकसानीची नोंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, शेतमजूर यांच्या मागण्या ऐकुन घेतल्या आहेत. संकटात सापडलेल्या प्रत्येक बांधवाला मदतीचा हात देणार. राज्य सरकार कुठेही मागे हटणार नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत. केंद्राकडून राज्याला मदत करण्याचे काम सुरु आहे. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सुरु आहे. लष्करानेही चांगले काम केले आहे. दोन दिवसांत पूरस्थितीचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मिळून आढावा घेऊन निर्णय घेऊ असेही पवारांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपल्याला नेहमीच अशा प्रकारची परिस्थिती आल्यावर एनडीआरएफ, कोस्टगार्ड, नेव्हीची मदत लागते. त्यामुळे राज्यात एसडीआरएफची एक टीम कराडला ठेवता येईल का? याचा विचार सुरु आहे. रायगड, रत्नागिरीला एक टीम ठेवली जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. याचा चांगला उपयोग होईल आणि वेळेचीही बचत होईल. भीमा खोर्‍यात सर्व धरणांची यंदा टक्केवारी 60 आहे. गेल्यावर्षी 25 टक्के होती. तर कृष्णा खोर्‍यातील धरणे गेल्यावर्षी 50 टक्के भरली होती. यंदा 85 टक्के भरल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पूर ओसरल्यानंतर आता पूरग्रस्त भागात रोगराईची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. औषधांचा पुरवठा कमी पडू देणार नाही. सांगली येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर, बंद पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. राज्यभरातून धान्य, मदत मिळत आहे. राज्य सरकार शंभर टक्के मदत करणार यात दुमत नाही. तौक्ते, निसर्ग वादळ आले तेव्हा एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवत अडीच टक्के मदत केली होती. उद्या किंवा परवा मदतीबाबत निर्णय जाहीर होईल. केेंद्राने केेंद्राची जबाबदारी पार पाडावी. राज्य सरकार म्हणून आम्ही तसूभरही मदत करण्यास मागे पडणार नसल्याची ग्वाहीच अजित पवारांनी दिली. जनतेनेही फुल ना फुलाची पाकळी म्हणून पुरग्रस्तांना मदत करावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, मंत्री यांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तांना देणार असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

नारायण राणेेंना टोला

अजित पवार यांनी नारायण राणेेंना टोला लगावत सांगितले की, पुरग्रस्त भागात आता केेंद्रीय मंत्री असो वा राज्य सरकारचे मंत्री भेट देत आहेत. यावेळी फिरताना नोडल अधिकारी त्यांच्यासोबत असणार आहे. कलेक्टरना पंचनामे पुर्ण करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयात बसून नियंत्रण करतील. प्रत्येका बरोबर दौर्‍यावेळी हजर राहणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button