TOP Newsताज्या घडामोडी

मनपाने पेठ रस्त्यावरील वटवृक्ष हटविला

पंचवटीतील पेठ रस्त्यावरील शनी मंदिरालगतचा वटवृक्ष एका बाजूला झुकल्याने निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन मनपाने सोमवारी दुपारी तो तातडीने हटविला. या झाडाचे चामारलेणी भागात पुनर्रोपण केले जाणार आहे. पुनर्रोपणासाठी शास्त्रोक्त पध्दतीने झाड काढावे लागते. घाईघाईत वडाचे झाड हटविताना ही पध्दत अवलंबली गेली का हा प्रश्न आहे. पुनर्रोपणाचा आजवरचा इतिहास बघता या वटवृक्षाचे काय होईल, याबद्दल साशंकता आहे.

पेठ रस्त्यावरील शनि मंदिरालगत विशाल वडाचे झाड होते. या ठिकाणीच जलकुंभ भरणारी मुख्य जलवाहिनी तसेच अन्य जल वाहिन्या आहेत. पाण्याच्या दाबाने तिथे खड्डा पडला होता. त्यामुळे वटवृक्ष एका बाजूला झुकला, असे या भागातील माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे यांनी सांगितले. मनपा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. जल वाहिनी फुटल्याने आणि झाडाचा विस्तार एका बाजूला असल्याने ते झुकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. काही दुर्घटना घडू नये म्हणून झाड हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारी मनपाच्या कर्मचाऱ्यांची झाड काढून घेतले. यावेळी जलवाहिनीचे नुकसान झाले. या झाडाचे चामारलेणी भागात पुनर्रोपण केले जाणार असल्याचे मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी सांगितले. जल वाहिन्यांची दुरुस्ती लगोलग सुरू करण्यात आली.

पुनर्रोपणाची यशस्विता कशावर ?

वृक्षांचे पुनर्रोपण ही शास्त्रशुध्द पध्दतीने केली जाणारी प्रक्रिया आहे. पुनर्रोपण करावयाचे झाड अतिशय नाजुकपणे काढावे लागते. मुळांची जपवणूक, झाडाच्या विस्ताराची दिशा यावर लक्ष द्यावे लागते. पुनर्रोपणानंतर झाडाची निगा महत्वाचा भाग आहे. या माध्यमातून पुनर्रोपण यशस्वी करता येते, असे पर्यावरणप्रेमी अश्विनी भट सांगतात. मनपाने वडाचे झाड जलदगतीने काढताना ती दक्षता घेतली की नाही, याची स्पष्टता झालेली नाही. मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणावेळी महामार्गावरील अनेक झाडांच्या पुनर्रोपणाचा प्रयोग झाला होता. आवश्यक ती काळजी घेऊन झाडे काढली गेली. पुन्हा त्यांची लागवड करण्यात आली. काही झाडे खडकाळ जमिनीवर लावली गेली. पाण्याची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्रोपण यशस्वी झाले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घेतल्याने त्यांचे पुनर्रोपण यशस्वी ठरल्याची उदाहरणे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button