जोगेश्वरीतून जकिर हुसैन शेख मुंबई पोलिसांच्या ताब्यात
![Zakir Hussain Sheikh from Jogeshwari in the custody of Mumbai Police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/crime-registered-patangbaj_202101544305-e1625639033763.jpg)
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीत घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला होता. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी 6 संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत शुक्रवारी रात्री या प्रकरणाशी संबंधित आणखी एका जणास मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव जकिर हुसैन शेख असे असून झाकीरला आपल्या ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक मुंबईमध्ये येणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी पाकिस्तानच्या हँडलरकडून चालविल्या जाणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. या मॉड्यूलशी संबंधित 6 लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोन जण पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेले होते. सणासुदीच्या कालावधीदरम्यान दिल्ली, यूपी, महाराष्ट्रात स्फोट घडविण्याचा कट ते रचत होते. त्यांच्या चौकशीदरम्यान दिल्ली पोलिसांना कळले की, मुंबईचा रहिवासी झाकीरही त्यांच्यासोबत कटात सहभागी होता. यानंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी झाकीरला नागपाड्यातून पकडले. आता त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्पेशल सेलची टीम मुंबईला रवाना झाली आहे. ही टीम त्याला दिल्लीला घेऊन येणार आहे.
दरम्यान झाकीर हा धारावीतील जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालीया याचा हॅन्डलर होता. झाकीरचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून तो दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमचा उजवा हात आहे. शाकीरच्या मायमातून झाकीर हा अनिस इब्राहिमच्या सातत्याने संपर्कात होता. त्यामुळे मुंबईच्या क्राईम ब्रॅन्चच्या रडारवर तो सुरुवातीपासूनच होता. झाकीरने अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरुनच जान मोहम्मदला या दहशतवादी हल्ल्याच्या योजनेमध्ये सामिल केले होते. झाकीर अंडरवर्ल्डमधील स्लीपर सेल पद्धतीने काम करत असून जान मोहम्मदला तो लॉजिस्टिक सपोर्ट देत होता. झाकीरच्या सांगण्यावरुनच जान मोहम्मद दिल्लीसाठी रवाना झाला होता. असे तपासातून उघड झाले आहे.