उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज देणार; एमपीएससीचा महत्त्वाचा निर्णय
![Will give a scanned image of the answer sheet; Important decision of MPSC](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/MPSC.jpg)
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल आणखी पारदर्शक पद्धतीने पाहता यावा, यासाठी आयोग उमेदवाराच्या मूळ उत्तर पत्रिकेची स्कॅन इमेज, निकालासाठी गृहीत धरलेले गुण आणि संबंधित प्रवर्गाची कटऑफ लिस्ट उपलब्ध करून देणार आहे. अशाप्रकारे परीक्षार्थींना सुविधा देणारे महाराष्ट्र त्यामुळे पहिले राज्य ठरले आहे.
एमपीएससीच्या निकालात अधिक पारदर्शकता यावी आणि विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही शंका राहू नये यासाठी त्यांच्या उत्तरपत्रिकेची मूळ प्रत स्कॅन इमेज स्वरूपात त्यांना पाहता येणार आहे. लोकसेवा आयोगाच्या २७ मार्च २०२१ च्या स्थापत्या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० साठी सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालासाठी गृहीत धरलेले गुण आणि कटऑफ ही माहिती दिली जाणार आहे. आयोगाच्या वेबसाईटवर परीक्षार्थींना वेबलिंकद्वारे ही माहिती मिळणार आहे, असे आयोगाने म्हटले आहे.