हे काय वित्त नियोजन आहे का?; जयंत पाटलांचा निर्मला सीतारामन यांना सवाल
![What is this financial planning ?; Jayant Patil's question to Nirmala Sitharaman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/jayant-patil-fb-1200.jpg)
मुंबई |
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या गुलालाची उधळण होताच पेट्रोल-डिझेलच्या दराच्या झळा सर्वसामान्यांना बसू लागल्या आहे. निवडणुकीच्या निकालापासून देशात दररोज इंधनांची दरवाढ होत असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेट्रोलचे दर शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करू लागले आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाच लक्ष्य केलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर भूमिका मांडत ‘हे काय वित्त नियोजन आहे का?’, असा सवाल पाटील यांनी सीतारामन यांना केला आहे.
देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढ होत आहे. परभणीत देशातील सर्वात महागड्या दराने म्हणजे पेट्रोल प्रतिलिटर १००.७५ पैसे तसेच डिझेलही प्रतिलिटर ९०.६८ रुपये दराने विक्री होत आहे. तर मुंबईतही पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. या वाढत्या दरावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल केला आहे. “निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की, दरवाढ ही ठरलेलीच; हे काय वित्त नियोजन आहे का? केंद्रीय अर्थमंत्रालय वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच! हे काय वित्त नियोजन आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केला आहे. @Jayant_R_Patil @nsitharaman @PMOIndia #FuelPriceHike pic.twitter.com/KnTENdMfFD
— NCP (@NCPspeaks) May 12, 2021
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचे आजचे दर (प्रतिलिटर। रुपयांमध्ये)
मुंबई पेट्रोल – ९८.३६ , डिझेल – ८९.७५
पुणे पेट्रोल – ९८.०६, डिझेल – ८८.०८
नागपूर पेट्रोल -९७.७५, [डिझेल -८७.९८
नवी मुंबई पेट्रोल -९८.५६, डिझेल – ८९.९४
नाशिक पेट्रोल – ९८.७६, डिझेल – ८८.७६
औरंगाबाद पेट्रोल- ९९.६०, डिझेल – ९०.९९