वाशीतील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित
वाशी विभागातील अनेक अतिधोकादायक इमारती घोषित
![Vashi, high-risk, buildings, water supply, disconnected, declared,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/vashi-1-780x470.jpg)
नवी मुंबई : महानगरपालिका सी – विभाग वाशी कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई पालिकेने केली आहे. वाशी विभागातील जवळजवळ २५० हून अधिक घरांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
नवी मुंबई शहरात शहाबाज गावात घडलेल्या दुर्घटनेत ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर शहरातील बेकायदा तसेच अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशी विभागातील अनेक अतिधोकादायक इमारती घोषित करण्यात आल्या असताना नागरिकांनी घरे खाली केली नाहीत. तर पालिकेचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. बेलापूर विभागातील दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त शिंदे यांनी अतिधोकादायक इमारती तात्काळ खाली करण्याचे आदेश दिल्यामुळे विभागस्तरावर पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठा खंडित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये मे. साई दर्शन को. ऑप. हौ. सो. लि. भुखंड क्र. २६ सेक्टर १४ वाशी येथील १६ सदनिकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या आदेशानुसार वाशी विभागातील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत असून सोमवारीही कारवाई करण्यात आली आहे. तसेच मंगळवारीही जवळजवळ २५० पेक्षा अधिक घरांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. – सागर मोरे, अतिरिक्त आयुक्त, वाशी विभाग