व्यापारी अपहरणप्रकरणी पोलिसांची नाहक धावपळ
![Unnecessary rush of police in case of kidnapping of a trader](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/vv1-police-1.jpg)
नवी मुंबई | एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पोलीस आरोपीला अटक करून घेऊन जाताना स्थानिक पोलिसांना कळवले नाही तर कसा मनस्ताप होतो. विनाकारण किती तरी तास तपासात कसे वाया जातात याचा अनुभव पोलिसांना आला. एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केल्यावर त्याची तात्काळ शोधाशोध सुरू झाली. मात्र त्याचे अपहरण झाले नसून फसवणूक गुन्ह्यासाठी ग्वाल्हेर पोलीस त्याला अटक करून घेऊन गेल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी नि:श्वास सोडला. मात्र त्यामुळे नाहक १२ तासांची करावी लागलेली धावपळ व्यर्थ ठरली.
विलेपार्ले येथे राहणारे व्यापारी वीरेंद्र गुप्ता हे एपीएमसी भागात आले होते. त्यांनी याच भागात अन्यत्र जाण्यासाठी रिक्षा केली. मात्र काही अंतर गेल्यावर एका इनोव्हा गाडीतून काही लोक उतरले व त्यांना पकडून घेऊन गेले. या घटनेने रिक्षाचालक हादरला होता. त्याने याची माहिती कोणालाच दिली नाही. मात्र हे प्रकरण आज ना उद्या उघडकीस येईल तेव्हा आपल्यावरही कारवाई होऊ शकते या भीतीने त्याने थेट एपीएमसी पोलीस ठाणे गाठून प्रवाशाचे अपहरण झाले म्हणून गुन्हा नोंद केला.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखाली पथके नेमली आणि तपास सुरू केला. व्यापाऱ्याच्या घराचा पत्ता शोधून काढल्यावर घरी पोलीस पथक धडकले आणि त्यांनाही गुन्हा नोंद करण्यास सांगण्यात आले. मात्र दुसरा दिवस उजाडला तरी गुन्हा नोंद करण्यास कोणीच उत्सुक नसल्याचे समोर आल्यावर एपीएमसी पोलिसांनाही काही तरी वेगळाच प्रकार असल्याचा संशय आला. त्यामुळे कुटुंबीयांची चौकशी केल्यावर वीरेंद्र याला ग्वाल्हेर पोलीस अटक करून घेऊन गेल्याचे समोर आले.
रिक्षाचालकाकडून अपहरणाचा गुन्हा दाखल
एपीएमसीमध्ये वीरेंद्र गुप्ता यांच्या परिचित व्यक्तीचे दुकान आहे. त्याच दुकानात रिक्षाचालक नितीन चिकनेचा एक नातेवाईक काम करतो. त्यामुळे नितीन यांना वीरेंद्र यांचे नाव माहिती होते. दरम्यान नितीन यांनी ऐरोलीचे भाडे करून येत पुन्हा दुकानात जाऊन वीरेंद्र घरी पोहोचले का याची शहानिशा केली. मात्र वीरेंद्र घरी पोहोचले नव्हते हे समजल्यावर रिक्षाचालक नितीन चिकने यांची खात्री झाली की, पोलीस असल्याचे सांगून तिसऱ्यानेच त्यांचे अपहरण केले असावे. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंद केला. वीरेंद्र गुप्ता हा एक महिन्यापूर्वीच मुंबईत वास्तव्यास आला आहे. यापूर्वी कोलकाता येथे तो वास्तव्य करीत होता. त्याच्याविरोधात ग्वाल्हेर येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद होता, त्याच गुन्ह्यात ग्वाल्हेर पोलीस त्याला घेऊन गेले.
आरोपीला कुठूनही अटक केले जाऊ शकते, मात्र अटक केल्यावर स्थानिक पोलिसांना कळवणे आवश्यक आहे. ते ग्वालियर पोलिसांनी न केल्याने सुमारे १२ तास त्याचा शोध पोलीस घेत होतेच. शिवाय सीसीटीव्ही शोधणाऱ्या सायबर टीमचाही वेळ गेला. सदर गुन्हा रद्द करण्यात येणार आहे.
– विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त