TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ठाणे, कल्याण, दादर स्थानकांतून प्रवास लवकरच सुकर ; मेल-एक्स्प्रेसचे थांबे बदलण्यासह फलाटांच्या रुंदीकरणाचा निर्णय  

मुंबई : वाढत्या गर्दीमुळे ठाणे, कल्याण आणि दादर स्थानकांत प्रवाशांना जाच होतो. त्यावर मात करण्यासाठी मध्य रेल्वे विविध उपाययोजना करणार आहे. त्यानुसार ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच आणि सहावर थांबणाऱ्या दहा मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना सात आणि आठ क्रमांक फलाटावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पाच आणि सहा क्रमांक फलाटावरील दुकाने हटविण्यात येणार आहेत. कल्याण स्थानकातीलही चार, पाच क्रमांक फलाटावरील दुकाने आणि तत्सम बांधकाम हटविणे आणि दादर येथील  फलाटांच्या रुंदीकरणाची योजना आहे. 

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी नुकतीच ठाणे स्थानकासह अन्य काही स्थानकांना भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. ठाणे, कल्याण, दादरमार्गे नियमित मेल-एक्स्प्रेस आणि विशेष गाडय़ा अशा दररोज २५० ते ३०० मेल-एक्स्प्रेस जातात. त्यात लोकल फेऱ्यांचाही समावेश होतो. यापूर्वी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक सात आणि आठवर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा दिला जात होता. त्यानंतर यामध्ये बदल करून पाच आणि सहा क्रमांकावर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा देण्यास सुरुवात झाली. या फलाटांवर जलद लोकलही येत असल्याने फलाटांवर मेल-एक्स्प्रेस आणि लोकल प्रवाशांची गर्दी होते. मध्य रेल्वेने या फलाटांवर थांबणाऱ्या  १८ मेल-एक्स्प्रेससाठी सात आणि आठ क्रमांकाच्या फलाटावर थांबा देण्यास सुरुवात केली. आता आणखी १० मेल-एक्सप्रेस गाडय़ांना सात व आठ क्रमांकाच्या फलाटावर थांबा देऊन गर्दी आटोक्यात ठेवण्यात येणार असल्याचे रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले.  

कल्याण स्थानकाच्या तीन आणि चार क्रमांक फलाटावरील दुकाने व काही बांधकामे हटविणे, दादर स्थानकात मध्य रेल्वेच्या एक आणि दोन क्रमांकाच्या फलाटासह अन्य फलाटांची रूंदी वाढविण्याची योजना आखण्यात आली आहे.

युटीएस’ अधिक सक्षम..

युटीएस मोबाईल अ‍ॅपवरून केवळ ७ ते ८ टक्के तिकीट विक्री होते. या अ‍ॅपला प्रतिसाद आणखी वाढावा यासाठी ते हाताळणाऱ्या क्रिस या संस्थेशी बोलणी सुरू आहेत.  सध्या मध्य रेल्वे मुंबई विभागात ३१८ एटीव्हीएम मशिन कालबाह्य झाल्या असून त्या हटविण्यात येणार आहेत. त्याजागी ४५० नव्या एटीव्हीएम मशीन आणल्या जाणार आहेत.

दादर स्थानक पुनर्विकास..

रेल्वे जमिन विकास प्राधिकरणाकडून  दादर स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सविस्तर प्रकल्प अहवाल आणि निविदाची प्रक्रिया रेल्वे जमिन विकास प्राधिकरणच राबविणार आहे. कल्याण यार्ड नूतनीकरणाचे कामही हाती घेण्यात आले असून ते पूर्ण झाल्यावर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा उपनगरीय लोकलला होणारा अडथळा कमी होणार आहे. कल्याण ते कसारा व कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण करीत असून ते पूर्ण होताच  लोकल फेऱ्या वाढण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button