यंदा उन्हाच्या झळा अधिक तीव्र होणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
![This year the heat wave will be more intense; Forecast of Indian Meteorological Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/images-5-2.jpeg)
मुंबई | वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पावसाळ्यापूरताच मर्यादीत राहणार नाही तर यंदा उन्हाच्या झळाही अधिक तीव्र असणार आहेत. देशातील दक्षिण भाग तसेच मध्य भारत, उत्तरेकडील प्रदेश आणि पूर्व भारतामध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाचा उन्हाळ्यात ऊन आणि उकाड्याला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी उन्हाळा तसेच मार्च महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज जाहीर केला. पृथ्वीविज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘मान्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीम’च्या साह्याने ‘आयएमडी’तर्फे २०१६ पासून हिवाळा आणि उन्हाळ्याचा विभागवार हंगामी अंदाज देण्यात येतो. यंदाच्या उन्हाळाच्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे.
मार्च महिन्यात महाराष्ट्रात बहुतेक सर्व ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडून इतर जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये महिन्याच्या सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मार्चमधील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल, असे ‘आयएमडी’च्या महिन्याच्या अंदाजात दर्शवले आहे