मुखपट्टीपासून अद्याप मुक्ती नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण
![Important decision of state government regarding arrears of sugar factories, announcement of Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Ajit-Pawar3.jpg)
मुंबई | मंत्रिमंडळात मुखपट्टीपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत करोना जात नाही, तोपर्यंत मुखपट्टी लावावीच लागेल. ज्यावेळी मुखपट्टी काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही सांगू. तोपर्यंत मुखपट्टी लावायची म्हणजे लावायचीच, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वरळी, वरळी कोळीवाडा, माहीम रेतीबंदर, महालक्ष्मी, हिल टॉप लेन आदी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. वाहनाचे सारथ्य आदित्य ठाकरे यांनी केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. आदित्य ठाकरेंसह दौरा केला आणि त्यांनी गाडीचे सारथ्य केले याचा अर्थ मुंबई महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादीची युती झाली असा होत नाही. युतीबद्दल दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीबद्दल माध्यमांनी विचारले असता प्रत्येकाला गाडी चालवण्याची आवड असते. मुख्यमंत्रीही अनेकदा ‘मातोश्री’वरून ‘वर्षां’वर येताना गाडी चालवतात. आदित्य ठाकरे यांनी गाडी चालवली म्हणून असे अंदाज बांधण्याची गरज नाही. आमचे तीन पक्षांचे सरकार असून काही मित्रपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. जिथे चांगलं चाललं आहे ते पाहून आपल्या भागातही राबवावं असा प्रयत्न आहे. मुंबई चांगली दिसावी तसेच मुंबईत खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तसेच युवा नेते आदित्य ठाकरे यांचा आहे. सर्वानी एकत्र काम करण्याचे ठरले आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचाही अधिकार आहे. निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात. त्यासंबंधी सध्या चर्चा करण्याचे काही कारण नाही, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.
मला ही विकासकामे पहायची होती. काही लोक मुद्दाम जातात, पाहणी करतात. मग असे बोट करा सांगत फोटो काढले जातात. आम्हाला अशी नौटंकी करायची नव्हती. आमचा त्यासंबंधी कोणताही विचार नव्हता. चांगल्या कामाला जास्त काही मदत हवी तर केली पाहिजे या मताचे आम्ही असल्याने ही पाहणी केली, असे पवार म्हणाल़े