ताज्या घडामोडीमुंबई
धारावीत कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही; धारावी मॉडेलची अशीही किमया
![There is no active patient of corona in Dharavi; Such is the alchemy of Dharavi model](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/112440773_dharavi-2.jpg)
मुंबई | आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी धारावी मॉडेलचा पालिकेने अवलंब केला. धारावी मॉडेलमुळे अनेकदा शून्य मृत्यूची नोंद या ठिकाणी झाली आहे पण आता धारावीत एकही सक्रिय रुग्ण नाही. त्यामुळे धारावीकरांनी करून दाखवले, असे म्हटले जात आहे.
धारावीत मार्च २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटेत सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. तिसऱ्या लाटेदरम्यान धारावीत ७ जानेवारीला १५०, तर ८ जानेवारीला १४७ रुग्णांची नोंद झाली होती. धारावीत आतापर्यंत एकूण ८,६५२ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र तब्बल दोन वर्षांनी धारावीत एकाही सक्रिय रुग्णाची नोंद नाही. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत १३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ७८,७२,९५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ७७,२४,२१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १,४३,७७२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात ९६५ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.