मुंबई विद्यापीठाच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील तीन एकर क्षेत्रफळावर झोपडपट्टी उभारून अतिक्रमण केल्याची बाब ताजी आहे.
![The issue of encroachment by setting up slums on three acres of land at Bandra-Kurla complex of Mumbai University is fresh.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/mumba-.jpg)
मुंबई | मुंबई विद्यापीठातील विविध बांधकामांच्या कामासाठी आलेल्या मजुरांनी येथेच झोपडय़ा उभारून मुक्काम ठोकल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या १४ वर्षांपासून ही कुटुंबे येथे वास्तव्यास असून यापैकी अनेक कुटुंबातील मुलांच्या जन्मदाखल्यावर विद्यापीठाचा पत्ता असल्याची धक्कादायक बाब अधिसभा सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी निदर्शनास आणून दिली.
मुंबई विद्यापीठाच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील तीन एकर क्षेत्रफळावर झोपडपट्टी उभारून अतिक्रमण केल्याची बाब ताजी आहे. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत होणाऱ्या वसाहतीसंदर्भात मुंबई विद्यापीठाचा न्यायालयीन लढाही सुरू आहे. असे असतानाही विद्यापीठ प्रशासन अतिक्रमणांकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कलिना संकुलात जवळपास १०० हून अधिक झोपडय़ा असून १४ वर्षांपासून त्या तेथे तळ ठोकून असल्याचा मुद्दा वैभव थोरात यांनी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत उपस्थित केला.
‘जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या मागे या झोपडय़ा असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांचे कामगार तिथे राहतात. विद्यापीठाने पडदा बांधून या झोपडय़ा झाकल्या आहेत. हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे असून भविष्यात इथेही झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीची मागणी होऊ शकते. कामगारांनी कुठे राहायचे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे, विद्यापीठाची नाही,’ असे थोरात यांनी म्हटले. त्यानंतर सर्वच अधिसभा सदस्यांनी या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुलगुरूंकडे केली.
या प्रकरणाची दखल घेऊन कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी, वैभव थोरात आणि वैभव नरवडे यांची समिती स्थापन करून दोन महिन्यांत झोपडय़ा हटवण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी केली. तसेच अतिक्रमणावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विद्यापीठाची सुरक्षा धोक्यात
कालिना संकुल हे बाहेरील वाहनांसाठी वाहनतळ झाले आहे. अवैधरीत्या उभ्या राहणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहेत. संरक्षक भिंत नसल्याने बाहेरून घुसखोरीही सुरू आहे. यावर तातडीने उपाय करण्याची मागणी सुधाकर तांबोळी यांनी केली. तर विद्यापीठाला एकही पूर्णवेळ सुरक्षा रक्षक अधिकारी नाही, पुरेसे सुरक्षा रक्षक नाहीत, मेटल डिटेक्टर, वॉकीटॉकी नाही अशा त्रुटी वैभव थोरात यांनी निदर्शनास आणून दिल्या. सुप्रिया करंडे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा अधोरेखित करत तातडीने सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली.