मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, दंड मागणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Police-Attack.jpg)
मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशात डोंबिवलीत मास्क न घातलेल्या तरुणांनी कारवाई करणाऱ्या पोलिसावर थेट कुत्रा सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आणि महापालिकेच्या कारवाई पथकाकडून संयुक्तरित्या विनाकारण फिरणारे आणि मास्क न घालता फिरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु आहे. मात्र, डोंबिवली पूर्व भागातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने कारवाई पथक कारवाईसाठी फिरत असताना विचित्र प्रकार घडला.
एका ठिकाणी गणेश ऑटोमोबाईल नावाचे गॅरेज सुरु होते. या गॅरेजसमोर तीन जण बसले होते. त्यांनी मास्क घातला नव्हता. या दुकानात दोन पाळीव कुत्रे होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या तिघांना मास्क न घातल्याने पाचशे रुपये दंड भरण्यास सांगितले. या तिघांनी कारवाईस विरोध केला. यानंतर कुत्र्याला छू म्हटल्याने त्या कुत्र्याने अनिल तायडे या पोलीस कर्मचाऱ्याचा चावा घेतला.
दरम्यान, रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता आणि आदित्य गुप्ता यांच्या विरोधात कारवाई केली आहे. यापैकी दोन जणांना अटक केली आहे. तसेच आणखी एकाचा पोलीस शोध घेत आहेत.