मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारने दिली परवानगी
![# Covid-19: Private hospitals purchase vaccines directly from companies from May 1](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/corona-vaccine_1584368936.jpg)
मुंबई – केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावं, तसंच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असं विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान महाराष्ट्राला देण्यात यावं. महाराष्ट्र सरकार त्याचा वापर करुन हाफकिनकडून लस निर्मिती करेल. अथवा महाराष्ट्र सरकारच्या सर्व संसाधनांचा वापर करुन केंद्रानं सर्व पुरवठा करावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लावून धरली होती.