रेल्वे प्रवाशांचे चोरलेले मोबाइल उत्तर प्रदेश, बिहारमध्ये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/mobile-network.jpg)
मुंबई | गेल्या चार वर्षांत मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना चोरीला गेलेले आणि अद्यापही हस्तगत न झालेल्या ४,१०३ मोबाइलचा लोहमार्ग पोलिसांनी ठावठिकाणा काढला. ४,१०३ पैकी जवळपास १,५४४ मोबाइल उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत देशभरातील विविध राज्यातून केवळ १६६ मोबाइलच हस्तगत करण्यात आले आहेत.
लोकल प्रवासात गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या मोबाइलवर चोर डल्ला मारतात. प्रवाशांच्या तक्रारींची माहिती घेऊन लोहमार्ग पोलिसांनी डिसेंबर २०२१ पासून चोरीला गेलेल्या ४,१०३ मोबाइलचा ठावठिकाणा शोधला आहे. त्यासाठी १ जानेवारी २०२२ पासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी विशेष पथकही तयार केले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान २०१८ ते २०२१ या काळात चोरीला गेलेल्या चार हजारपैकी ३९८ मोबाइल मुंबईत, तर ४२४ मोबाइल उर्वरित महाराष्ट्रात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेले १,१०२ मोबाइल उत्तर प्रदेशमध्ये, तर ४४२ मोबाइल बिहारमध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्येही ४४१ मोबाइल असल्याचा ठावठिकाणा लागला आहे. हे मोबाइल हस्तगत करण्याचा प्रयत्न लोहमार्ग पोलीस करीत आहेत.