सायन उड्डाणपूल ३ महिने दर शनिवार-रविवार बंद
![Sion flyover closed every Saturday-Sunday for 3 months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Sion-flyover.jpg)
मुंबई – एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सायन उड्डाणपुलाचे सांधे आणि नादुरुस्त बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेतल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. कारण एमएसआरडीसीने या कामासाठी १५ ऑक्टोबर ते ९ जानेवारी असे तीन महिने दर शनिवारी आणि रविवारी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ या वेळेत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असतो. त्यामुळे उपनगराकडून सकाळी मुंबईकडे येणाऱ्या आणि सायंकाळी मुंबईतून उपनगराकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यासाठी वाहतूक पोलिसांनी काही मार्गांत बदल केले आहेत.
काल शनिवारी सकाळपासूनच इस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसले. शनिवारी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे वाहतूककोंडीत हाल झाले. ९ जानेवारी २०२२पर्यंत अशाचप्रकारे दर विकेन्डला उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईकरांनी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शीव सर्कल येथे खासगी ट्रॅव्हल्स बसेसना प्रवेशबंदी व वाहन थांबविण्यास निर्बंध घातले आहेत. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील अरोरा जंक्शन ते हायवे अपार्टमेंट दरम्यानच्या दोन्ही मार्गिंकांवर खास बसेसनाही बंदी असेल. याउलट दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या खासगी प्रवासी बसेसना अरोरा जंक्शन येथून उजवे वळण घेऊन पुढे वडाळा ब्रिजवरून बरकत अली नाकामार्गे वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीतून बीपीटी रोडमार्गे वडाळा टी.टी. रोडवरून ठाणे किंवा पनवेलच्या दिशेने जाण्यास मुभा असेल, तसेच सायन हॉस्पिटल येथून येणाऱ्या गाड्या सायन जंक्शनला डावीकडे जाऊन सुलोचना शेट्टी मार्गाने माहीम बंदराच्या दिशेने मार्गक्रमण करतील, अशी माहिती वाहतूक विभागाचे मध्य मुंबईचे पोलीस उपआयुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.