शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे गर्दी नियंत्रण मॉडेल देशभरासाठी आदर्श
शेगावमध्ये दरवर्षी लाखो भाविक, कधीही चेंगराचेंगरीसारख्या घटना घडत नाही
मुंबई : तिरुपती येथील चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर धार्मिक स्थळांवर गर्दी नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भारतातील अनेक मोठ्या धार्मिक स्थळांवर लाखो भाविक येत असतात. मात्र, योग्य नियोजनाचा अभाव असल्यास अशा दुर्घटना घडू शकतात. विदर्भातील शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे गर्दी नियंत्रण मॉडेल हे देशभरासाठी आदर्श ठरू शकते. शेगावमध्ये दरवर्षी लाखो भाविक येतात, तरीही तिथे कधीही चेंगराचेंगरीसारख्या घटना घडत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे संस्थानचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि नियोजन.
मुख्य उत्सव आणि गर्दी व्यवस्थापन
गजानन महाराज संस्थानतर्फे वर्षभरात तीन मोठे उत्सव आयोजित केले जातात – प्रगट दिन उत्सव, ऋषीपंचमी (पुण्यतिथी) आणि श्रीराम नवमी उत्सव. या काळात लाखो भाविक शेगावला येतात. विशेषतः प्रगट दिन उत्सवात ५ ते ६ लाख भाविक उपस्थित राहतात. या काळात संस्थानकडून भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येते.
प्रवेश आणि निर्गमनासाठी वेगळे मार्ग
मंदिर परिसरात भक्तांना एका मार्गाने दर्शनासाठी प्रवेश दिला जातो आणि दुसऱ्या मार्गाने बाहेर काढले जाते. यामुळे गर्दीचा कोणताही अडथळा होत नाही.
२४ तास खुले मंदिर
सामान्यतः मंदिर रात्री १० वाजता बंद होते. मात्र, उत्सवात गर्दीच्या काळात मंदिर २४ तास खुले ठेवले जाते. त्यामुळे भाविकांना रात्रीच्या वेळेसही दर्शन घेता येते आणि एकाच वेळी होणारी गर्दी कमी होते.
हायटेक वाहनतळ आणि डिजिटल पार्किंग व्यवस्था
शेगावच्या गजानन महाराज संस्थानने देशातील पहिली हायटेक वाहनतळ व्यवस्था उभारली आहे. मंदिर परिसरात वाहने उभी राहू नयेत, यासाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
वाहनतळाची वैशिष्ट्ये
वाहनतळ पूर्णतः हायटेक आणि ऑटोमेटेड आहे. ५,००० कार, ३,००० दुचाकी आणि २० बससाठी जागा उपलब्ध आहे. पार्किंगमधील रिकाम्या जागांची माहिती डिजिटल फलकावर दाखवली जाते. सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेवाधारी इथं सेवा देतात. वाहनचालकांसाठी विश्रांतीगृह आणि स्वच्छतागृहे आहेत. या व्यवस्थेमुळे वाहनचालकांना सोयीने पार्किंग करता येते. तसेच, मंदिर परिसरात वाहने उभी राहात नसल्यामुळे गर्दी नियंत्रित राहते. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
भक्तांसाठी मोफत सेवा – भोजन, प्रवास आणि सामान ठेवण्याची सुविधा
गजानन महाराज संस्थानतर्फे भक्तांसाठी मोफत जेवण, प्रवास आणि सामान ठेवण्याची व्यवस्था केली जाते. प्रसाद स्वरूपात भक्तांना मोफत भोजन दिले जाते. भोजनगृहातही गर्दी नियंत्रणासाठी वेळापत्रक ठरवले जाते. यासाठी प्रशस्त इमारतीच बांधल्या आहे. यामध्ये मोठे हॉल आहेत. भक्तांनी नियम पाळावे म्हणून सेवाधारी वेळोवेळी नियम सांगत असतात.
प्रवासी सुविधा
भक्त निवास, आनंद सागर उद्यान, आणि रेल्वे स्थानक यामध्ये जाण्यासाठी मोफत बस सेवा दिली जाते. यामुळे भक्तांना चालण्याचा त्रास होत नाही आणि मंदिर परिसरात गर्दी कमी होते.
सामान ठेवण्याची सुविधा
भक्तांनी आपले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी मोफत लॉकरची सुविधा आहे. लॉकर वापरणाऱ्या भक्तांना पावती दिली जाते. यामुळे भक्त मंदिरात सामान न घेता प्रवेश करतात.
सेवाधारी – संस्थानच्या व्यवस्थेचा कणा
गजानन महाराज संस्थानमध्ये हजारो सेवाधारी नि:स्वार्थपणे सेवा देतात. हे सेवाधारी आपली सेवा फक्त श्रींच्या चरणी समर्पित करण्यासाठी येतात.सेवेकऱ्यांचे योगदान हे सेवेकरी एका महिन्यासाठी सेवेसाठी येतात आणि एका विशिष्ट गटात काम करतात. सेवा संपल्यानंतर सेवेकरी फक्त प्रसादाचा नारळ घेऊन गावी परततात. सेवाधारी संस्थानच्या सर्व विभागांमध्ये काम करतात – स्वच्छता, भोजन, दर्शन मार्गांचे व्यवस्थापन इत्यादी. या सेवेकऱ्यांच्या समर्पणामुळे संस्थानचा कारभार अत्यंत पारदर्शक राहतो, अशी माहिती आमचे स्थानिक प्रतिनिधी राजेश चौधरी यांनी दिली.
शेगावच्या व्यवस्थापनातून मिळणाऱ्या शिकवणी
शेगावच्या गजानन महाराज संस्थानने गर्दी नियंत्रणासाठी जे मॉडेल तयार केले आहे, ते देशभरातील धार्मिक स्थळांसाठी आदर्श ठरू शकते. त्यातून पुढील काही महत्त्वाच्या बाबी शिकता येतात. तिरुपतीतील दुर्घटना टाळण्यासाठी देशभरातील धार्मिक स्थळांनी शेगावच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भाविकांची सुरक्षा हा धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाचा मुख्य मुद्दा असायला हवा.
योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सेवाभावी वृत्ती यांच्या माध्यमातून गर्दी नियंत्रण करता येऊ शकते. शेगावच्या गजानन महाराज संस्थानने हे सिद्ध केले आहे की, योग्य व्यवस्थापनामुळे लाखो भाविकांचे दर्शन शांततेत होऊ शकते आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळता येऊ शकते .





