मुंबई पोलिस दलातील सात पोलिसांची तडकाफडकी बदली, चौकशीचे आदेशही दिले
![Seven policemen from the Mumbai police force were abruptly transferred and an inquiry was ordered](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Seven-policemen.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
पासपोर्ट विनाविलंब मिळावी यासाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. असे असतानाही दोन महिने उलटला तरी महिलेला पोलिसांच्या दिरंगाईमुळे पासपोर्ट मिळाला नाही. या महिलेने याबाबत आंदोलन करीत त्याचा व्हीडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करताच पोलिस आयुक्तांनी समता नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकासह सात पोलिसांची रविवारी तडकाफडकी बदली केली.
कांदिवली येथील नताशा नावाच्या महिलेने पासपोर्टसाठी दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. मात्र एका प्रकरणामुळे पोलिसांकडून पासपोर्टसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते. अनेकदा पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवूनही पोलिस टाळाटाळ करीत असल्याने नताशा हिने समता नगर पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले.
महिलेच्या नातेवाईकांनी या आंदोलनचा व्हीडीओ करून समाजमाध्यमांवर व्हायरल केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हीडीओची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निरिक्षक, उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल अशा सात पोलिसांची साइड ब्रॅन्च म्हणजेच सशस्त्र पोलिस दलामध्ये बदली केली. त्यांच्या विरूध्द विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.