‘बुरा न मानो होली है’ म्हणत संजय राऊतांचं खास ट्विट; निशाणा नेमका कुणावर?
![Sanjay Raut's special tweet saying 'Bura na mano holi hai'; Who exactly is the target?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/sanjay-Raut-3.jpg)
मुंबई |
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिल्यानंतर होळीनिमित्त खास ट्विट केलं आहे. ‘बुरा न मानो होली है’ हे म्हणत राऊत यांनी एक शायराना अंदाजात ट्विट केले आहे. या शायरीतून राऊतांनी नेमका कुणावर निशाणा साधला, यावर तर्कविर्तक लावले जात आहेत.
राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालेला आहे. विरोधी पक्ष भाजपाकडून सातत्याने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. तर सरकारमधील महत्त्वाचे मंत्री अनिल देशमुखही वादात सापडले आहेत. अशा राजकीय परिस्थितीत आलेल्या होळी निमित्त संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. “आसमान मे उडने की मनाही नही है, बस शर्त इतनी है कि जमीन को नजर अंदाज ना करे” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
बुरा न मानो..
होली है……… pic.twitter.com/4pqmYKGJoC— Sanjay Raut (@rautsanjay61) March 28, 2021
विरोधक की ठाकरे सरकार… निशाणा कुणावर?
संजय राऊत यांनी ट्विटमधून नेमका कुणावर निशाणा साधला अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. राऊत यांनी रोखठोक सदरातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह भाजपावर टीका केली होती. त्याचबरोबर ठाकरे सरकारलाही त्यांनी लक्ष्य केलेलं आहे. “महाराष्ट्रातील घडामोडींवर सर्वात जास्त चर्चा दिल्लीत झाली. कारण फडणवीस वारंवार दिल्लीत येऊन पत्रकार परिषदा घेत होते. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादणारच असे चित्र दिल्लीतील मीडियाने निर्माण केले. ते सर्वस्वी चुकीचे ठरले. विरोधी पक्षनेते वारंवार दिल्लीत जाऊन काय करतात, हा प्रश्न आहे. फडणवीस दिल्लीत गेले नसते तर या प्रकरणाची धग कायम राहिली असती”, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला होता.
दुसरीकडे ठाकरे सरकारलाही राऊत यांनी सावध केलं आहे. “अनिल देशमुख, वाझे, परमबीर यांचे पत्र या सर्व घोळात सरकारचा पाय नक्कीच अडकला. तो पुनःपुन्हा अडकू नये. अधिकाऱ्यांनी सरकारला अडचणीत आणले. वाझे हा साधा फौजदार, रश्मी शुक्ला या ज्येष्ठ आयपीएस. परमबीर हे त्यापेक्षा ज्येष्ठ. अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे. आपल्याच मर्जीतले अधिकारी नेमण्याचा पायंडा नव्याने पडला. हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरले! सरकारने काय करावे हे सांगण्यासाठी हा प्रपंच नाही. सरकार निसरड्या टोकावरून घसरत आहे व नशिबाने वाचत आहे. या सर्व खेळात महाराष्ट्राला नक्की काय मिळाले?,” असं राऊत म्हणाले होते.
वाचा- “वाझे गृहमंत्र्यांचा भरवशाचा माणूस होता, हे संजय राऊतांनीच कबूल केलंय”