रिलायन्स रिटेलने जस्ट डायलमधील ४०.९५ टक्के भागीदारी विकत घेतली
मुंबई – देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहातील रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने जस्ट डायल लिमिटेडमधील ४०.९५ टक्के भागीदारी ३ हजार ४९७ कोटींना विकत घेतली आहे. याशिवाय कंपनीने २६ टक्के खुल्या गुंतवणुकी ऑफरही दिली आहे. त्यामुळे रिलायन्स रिटेलची जस्ट डायलमधील एकंदर भागीदारी ६६.९५ टक्के होणार आहे.
रिलायन्स रिटेलने डिजिटल प्लॅटफॉर्म जस्ट डायलची एवढ्या मोठ्या प्रमाणात भागीदारी खरेदी केल्यामुळे जस्ट डायलचा व्यवसाय आणखी वृद्धींगत होणार आहे. यामुळे जस्ट डायलला आपली उत्पादने आणि सेवांचा विस्तार करण्यास मदत होणार आहे. रिलायन्सच्या या गुंतवणुकीमुळे जस्ट डायलचा डेटाबेस आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत जस्ट डायलचा डेटाबेस ३०.४ मिलियन लिस्टिंग होता. गेल्या तिमाहीत १२९.१ अब्ज युनिक युजर्सनी जस्ट डायल प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. रिलायन्स रिटेलची जस्ट डायलमधील ही भागीदारी व्यापारी, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्यास प्रोत्साहन देईल, असे या गुंतवणुकीबाबत बोलताना रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांनी सांगितले.
दरम्यान, रिलायन्स रिटेलने जस्ट डायलची एवढ्या मोठ्या प्रमाणात भागीदारी विकत घेतली असली तरी सध्याचे व्ही. एस. एस. मणी हेच जस्ट डायलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.