मुंबई, ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी; सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा
![Heavy rains in Konkan and western Maharashtra on Monday-Tuesday, call for vigilance](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Rain-3.jpg)
मुंबई -मुंबई, ठाण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून येत्या चार तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा
हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तसे घडल्यास तौक्ते चक्रीवादळानंतर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवे संकट ठरेल. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग परिसरात आपातकालीन प्रसंगाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.
ठाण्यात सतर्कतेचा इशारा
सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात देखील हजेरी लावली आहे. तसेच ते येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला देखील सुरवात झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत तुरळक घट दिसून येत आहे.