एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रताप सरनाईक; एकनाथ शिंदेंची नाराजी दूर

मुंबई : राज्यात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. या पदी प्रामुख्याने राजकीय नेत्याची वर्णी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही परंपरा बदलत अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती. मात्र, आता सरकारकडून अवघ्या महिन्याभरातच हा निर्णय बदलण्यात आला आहे. आता एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात अचानक संजय सेठी यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केल्याने हा शिवसेनेसाठी (शिंदे गट) मोठा धक्का मानला जात होता. त्यावेळी बोलताना सेठी यांची नियुक्ती तात्पुरती असून लवकरच नवीन अध्यक्ष नियुक्त होईल, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली होती. आता अखेर सरनाईक यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर केली असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजना फसवी; राज्यात महिला वर्गाची फसवणूक’; खासदार संजय राऊत
आतापर्यंत बहुतांशवेळा परिवहन मंत्र्यांकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. २०१४ ते २०१९ या काळात तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी या पदाची जबाबदारी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा परिवहन मंत्र्यांकडेच अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाला दररोज कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करताना दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे तोटा सहन करावा लागत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. महामंडळाला दरदिवशी तब्बल ३ कोटी रुपये तोटा होत असल्याचे ते म्हणाले होते.