‘लाडकी बहीण योजना फसवी; राज्यात महिला वर्गाची फसवणूक’; खासदार संजय राऊत

मुंबई : लाडकी बहीण योजना किती फसवी आहे ते आपण निवडणुकीनंतर पाहिले. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते. आता संबंधित खात्याच्या मंत्री महिला आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितले, ही महिलांची फसवणूक असून शासनाच्या तिजोरीवर भार पडत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, आज जागतिक महिला दिन आहे. पण महाराष्ट्राची गेल्या काही महिन्यांतील अवस्था पाहिल्यास महिलांवर होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत. मंत्री त्यात सामील आहेत. सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत. पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून दीड हजार रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत, या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्र आणि महिलावर्गाची फसवणूक करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा – महापालिकेने उभारलेल्या चिंचवड येथील पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण
मला काल काही वृद्ध कलाकार भेटले. त्यांना दर महिन्याला सरकारकडून काही मानधन मिळते. मात्र, लाडकी बहीण योजना आल्यापासून त्यांचे मानधन मिळाले नाही. ही आर्थिक अवस्था या राज्याची आहे. आर्थिक पाहणी अहवाल आला आहे, त्यावरच बोट दाखवले. हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडत आहे. या राज्यामध्ये आर्थिक अराजक माजले आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.