अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार; महापालिका आयुक्तांचा इशारा
![Police complaint against rumor mongers; Municipal Commissioner's warning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/mantralay-1.jpg)
मुंबई | स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची प्राप्तीकर खात्यामार्फत झालेल्या चौकशीत आपले नाव आल्याबद्दल, तसेच आपल्याला प्राप्तीकर खात्याकडून समन्स बजावण्यात आल्याबद्दल ट्विट करणाऱ्या समीत ठक्कर यांच्याविरोधात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मागील आठवडय़ात यशवंत जाधव यांच्या घरासह ३५ ठिकाणी प्राप्तीकर खात्याने छापा मारला होता. या प्रकरणी इक्बाल सिंह चहल यांची प्राप्तीकर खात्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून त्यांना प्राप्तीकर खात्यामार्फत समन्स बजावण्यात आले आहे, अशा आशयाटे ट्विट ठक्कर यांनी शुक्रवारी केले होते.
या ट्विटची चहल यांनी गंभीर दखल घेतली आहे. ‘प्राप्तीकर खात्याकडून आपल्यावर कोणतेही समन्स बजावण्यात आलेले नाही. आपल्याबद्दल अफवा उठविणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल’, असा इशारा चहल यांनी दिला होता. या प्रकरणी पालिकेचे विधी अधिकारी सुनील सोनावणे यांनी शुक्रवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये ठक्कर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. ठक्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे सोनावणे यांनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.