मध्य रेल्वेवरील प्लॅटफॉर्म तिकीट महागले
मुंबई : दीपावलीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी पाहता महत्वाच्या पाच रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याची २२ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी करण्यात आली असून ती ३१ ऑक्टोबरपर्यंत तात्पुरती लागू असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाची रक्कम १० रुपयांहून ५० रुपये करण्यात आली आहे. या स्थानकातून मेल-एक्स्प्रेस सुटतात तर काही गाड्यांना या स्थानकात थांबा आहे. मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना स्थानकात सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांचीही गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेनेही प्लॅटफॉर्म तिकीट वाढवले
मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेच्याही आठ स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, वापी, उधना आणि सुरत या स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत वाढवण्यात आली आहे. या स्थानकांवरील तिकिटंही १० रुपयांवरून ५० रुपये असे करण्यात आले असून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही वाढ लागू असेल, अशी माहीती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.