Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विशेष मुलांच्या पालकांसाठी शारीरिक व लैंगिक साक्षरता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

डॉ. सचिन नगरकर सरांचे व्याख्यान व दिव्यांग पालकांसोबत संवाद

पिंपरी | बौद्धिकदृष्ट्या अक्षमता व स्वमग्न व्यक्तींच्या शारीरिक गरजा व लैंगिक साक्षरता ह्या विषयावर मार्गदर्शन करण्याचा 30 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉ. सचिन नगरकर सरांचे व्याख्यान व प्रत्यक्ष संवाद कार्यक्रम सोबती दिव्यांग ग्रूपद्वारे, पिंपरीतील दिव्यांग भवन येथे आज दि. 28 सप्टेंबर रोजी आयोजित केला गेला.

या कार्यक्रमामध्ये दिव्यांग व्यक्तींचे पालक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ह्या विषयावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी सहभाग घेतला. सोबती दिव्यांग ग्रूपच्या ज्योतीताई आघारकरांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. सचिन नगरकर सरांनी चर्चा, संवाद व ब्रेनस्टॉर्मिंगद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. लैंगिकता ही कशी नैसर्गिक आणि जन्मजात आहे, मनुष्य प्राण्यापासून कसा विकसित झाला आहे आणि कसा करूणा, सहानुभूती, समानुभूती ह्या गुणांमुळे तो मनुष्यापासून वेगळा ठरतो, हे त्यांनी सांगितले. बौद्धिक अक्षम किंवा दिव्यांग मुलांनाही लैंगिक जाणीवा व संवेदना असतात. ते बौद्धिक अक्षम असतात, परंतु लैंगिक गरजा त्यांनाही तितक्याच असतात. आणि त्या लैंगिक गरजांना योग्य प्रकारे व्यक्त होणे आवश्यक असते. हे न झाल्यामुळे अनेकदा अशी मुले व प्रौढ चिडचिडे होतात किंवा अधिक अस्वस्थ होतात. अगदी स्वाभाविक किंवा नैसर्गिक अशी गरज पूर्ण न झाल्यामुळे होणारा हा ताण असतो. त्यांची लैंगिकता आपण समजून घेतली पाहिजे व तिचा निचरा होण्यासाठी मदत केली पाहिजे, असे सरांनी सांगितले.

ह्या गरजांचे शमन होण्यासाठी व योग्य प्रकारे त्यांचा निचरा होण्यासाठी विविध उपाय आहेत, असे सरांनी सांगितले. लहानपणापासून मुलांना हळु हळु सवय लावणे, सामाजिक प्रकारे स्वीकारार्ह व योग्य पद्धतीने त्या व्यक्त करण्याचे प्रशिक्षण देणे, प्रसंगी भिन्न लिंगी व्यक्तींची सोबत- सहवास आणि लैंगिक टॉयजचा योग्य वापर असे उपाय त्यांनी सुचवले. काय करायचं नाही, हे सांगण्यासह काय करायचं हेही सांगितलं पाहिजे. आणि जास्त सूचना देणं म्हणजे त्या व्यक्तीला रिजेक्ट करणं होतो, त्याउलट छोट्या गोष्टींचं कौतुक स्वीकार भाव दर्शवतो आणि पुढच्या पावलासाठी मदत करतो, असं सर म्हणाले.

हेही वाचा         :            पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

लैंगिक गरजांचं समाधान, विवाह करावा किंवा करू नये, त्यातून येणारी जवाबदारी आणि गुंतागुंती अशा मुद्द्यांवरही सरांनी चर्चा केली. त्या त्या परिस्थितीमध्ये मदतीसाठी व आधार देण्यासाठी किती व्यक्ती आहेत, सपोर्ट सिस्टीम कशी आहे ह्यानुसार ह्या गोष्टी ठरतात. कदाचित एकटे कुटुंब किंवा फक्त पालक अपुरे असतील, पण अनेक पालक एकत्र येऊन उपाय शोधू शकतात किंवा संस्था मिळून त्यावर मार्ग काढून हा आवश्यक सपोर्ट उपलब्ध करून देऊ शकतात, असं ते म्हणाले. डॉ. सचिन नगरकरांच्या हसत- खेळत झालेल्या भाषणाला व सोप्या पद्धतीने कठिण विषयाला हात घालणार्‍या भाषणाला पालकांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि ऑटीझम असलेल्या मुलाने लग्न करावं का, मुलाला सगळ्यांच्या समोर कपडे बदलू नको असं कसं शिकवायचं, मुलींना पाळीचं प्रशिक्षण कसं द्यायचं अशा व इतर प्रश्नांच्या माध्यमातून प्रतिसाद दिला. सरांनी ह्या सर्व प्रश्नांना व इतरही प्रश्नांना उत्तरे दिली व उपलब्ध साधने, सुविधा व प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. लैंगिकता हा विषय दाबून टाकण्याचा किंवा त्यांना कुठे आल्या वासना किंवा जाणीवा असं म्हणण्याचा नाही तर त्या लैंगिकतेला योग्य प्रकारे व्यक्त होण्यासाठी त्यांना मदत करण्याचा आहे असं ते म्हणाले.

दिव्यांग व्यक्तींच्या लैंगिकतेसंदर्भात अडचणी व मर्यादा असल्या तरी त्यावर मार्ग काढता येतो आणि मुलांची व प्रौढांची ऊर्जा अन्य विषयाकडे वळवता येते, त्यांना कौशल्ये शिकवता येतात, समाजात मिसळून त्यांना मैत्री व सोबत देता येते आणि काही प्रमाणात स्वावलंबी करता येतं, असं सोबती दिव्यांग ग्रूपच्या ज्योतीताई आघारकर ह्यांनी सांगितले. सप्तर्षी फाउंडेशनचे सचिव मनोज बोरसे ह्यांनी फाउंडेशनच्या कामाची व ‘वन स्टॉप सोल्युशनची’ माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वृषाली बोरसे ह्यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मीनीताताई पाटील, ज्योतीताई आघारकर, कल्पनाताई मोहिते, दिव्यांग भवनचे सर्व सदस्य, सप्तर्षी फाउंडेशनचे सल्लागार निरंजन वेलणकर , तसेच सप्तर्षी फाउंडेशनचे कार्यालयीन समन्वयक अश्विन वाल्हेकर , दिव्यांग भवन फाउंडेशनचे अक्षय नेहारकर , गणेश पारखे , गणेश चव्हाण , अभय नागमोडे, संबंधित संस्थांचे प्रतिनिधी, तीनही आयोजक संस्थांचे सदस्य, पालक बंधू- भगिनी ह्यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास एकांश ट्रस्ट यांचे आर्थिक सहाय्य लाभले तसेच मंथन फाउंडेशनच्या अध्यक्ष आशा भट्ट, सुयश फाउंडेशनचे सुरेश आस्वार, नवक्षितिज तर्फे सुभाष बर्गे सर, तसेच शुभांगी शहा ,विशेष शिक्षिका यांची उपस्थिती लाभली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button