दिशा सालियन प्रकरणात ‘पिक्चर अभी बाकी’, नीतेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा…

मुंबई : भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरूवारी दिशा सालियन प्रकरणात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना सूचक इशारा दिला. दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे व डिनो मोरिया याच्यासह अनेकांची नावे घेतली आहेत. या प्रकरणी येत्या 16 तारखेला सुनावणी होणार असून, तोपर्यंत थांबा, असे ते म्हणालेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय व वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झाले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. विशेषतः यात त्यांनी आदित्य ठाकरे यांचा या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘पिक्चर अभी बाकी हैं’ चा इशारा दिला.
नीतेश राणे गुरूवारी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दिशा सालियन प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यावर किती भाष्य करू शकतो याविषयी प्रश्नचिन्ह आहे. मुळात हा फक्त नीतेश राणे किंवा राजकीय आरोपांचा विषय नाही. दिशा सालियन यांच्या वडिलांनी स्वतःची मुलगी गमावली. ते सुद्धा राजकीय आरोप करणार आहेत का? ते सुद्धा कुणाचे नाव मुद्दाम घेणार आहेत का? त्यांनी स्वतः दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आदींची नावे घेतली आहेत. एक लक्षात घ्या. मी एवढेच सांगेन की, पिक्चर अभी बाकी हैं. पूर्ण पिक्चर अजून संपला नाही. कोर्टाने 16 तारीख दिलेली आहे. त्या तारखेला या प्रकरणात काय होते ते आपण पाहू. काही हरकत नाही.
राज्य सरकार व आत्ताच्या पोलिसांनी त्यांना जे नजरेसमोर दिसले असेल त्यानुसार आपला अहवाल सादर केला असेल. तुम्हाला आठवत असेल, या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली तेव्हा मी एक पत्र दिले होते. त्यात मी एका अधिकाऱ्यावर दिशा सालियन हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप केला होता. त्याला बदलण्याची मागणी मी केली होती. त्यामुळे जे काही प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे ते कोर्टात सादर करण्यात आले आहे. कोर्ट त्यावर योग्य तो निर्णय घेईल. दिशा सालियनचे वडील याविषयी काउंटर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. याविषयी 16 तारखेला काय होते ते पाहू, असे ते म्हणाले.
नीतेश राणे पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी यासंबंधी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण आमदार असल्याचे लपवले आहे. त्यांनी स्वतःला समाजसेवक व उद्योजक आहे अशी खोटी माहिती त्यांनी दिली आहे. त्याविरोधातही एक याचिका दाखल करण्यात आली आहे. म्हणजे कोर्टाला खोटे बोलणारे तुमच्याकडे येऊन किती खरे बोलत असतील हे येणाऱ्या दिवसांत कळेल. त्यामुळे या प्रकरणी कुणीही अर्धवट माहितीच्या आधारे वार्तांकन करू नये. घाईगडबड करू नये. हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. एका मुलीने आपले आयुष्य गमावले आहे. एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे. त्यामुळे आपण कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणावर भाष्य करू नये, असे ते म्हणाले.




