TOP Newsमुंबई

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना १५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्यांची प्रतीक्षा

लोकलमधील प्रवासी क्षमता वाढवून प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबा लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. मात्र याबाबत मध्य रेल्वेने उदासिन असल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेवर कल्याण – कसारा, कल्याण – कर्जत धीम्या मार्गावर १५ डबा लोकल प्रकल्प राबवण्याचा निर्णय तीन – चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या प्रकल्पाला मध्य रेल्वेकडून अद्यापही मूर्त स्वरुप देण्यात आलेले नाही. त्यामुळे सुकर प्रवासाला ब्रेक लागला आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवर १५ डबा लोकलच्या फेऱ्यांमध्ये कशी वाढ करता येईल यासंदर्भात पुन्हा विचारविनिमय सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेवर २०१३ मध्ये सीएसएमटी – कल्याणदरम्यान एक १५ डबा जलद लोकल सुरू करण्यात आली. त्यामुळे १२ डब्यांच्या लोकलच्या तुलनेत १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ झाली. या लोकलसाठी सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांतील जलद मार्गावरील फलाटांची लांबी वाढविण्यात आली. या लोकलमुळे प्रवासी क्षमता वाढली आणि प्रवाशांना गर्दीच्या प्रवासापासून काही प्रमाणात दिलासा मिळू लागला. मार्च २०१९ मध्ये या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आणि त्यात आणखी सहा फेऱ्यांची भर पडली. सध्या दोन १५ डबा लोकल धावत असून दररोज त्यांच्या २२ फेऱ्या होत आहेत.

तीन-चार वर्षांपूर्वी १५ डबा लोकल सेवेचा कर्जत, कसारापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये प्रथम अंबरनाथ, बदलापूर किंवा टिटवाळ्यापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार होता. त्यासाठी कल्याणपुढील सर्व फलाटांची लांबी वाढविण्यात येणार होती. तसेच काही ठिकाणी यार्ड, सिग्नल, ओव्हरहेड वायरसह अन्य तांत्रिक कामे करावी लागणार होती. यामुळे १५ डबा लोकल गाड्य़ांची संख्या आणि फेऱ्या वाढविण्यात आल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकला असता. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही.

कल्याण – कर्जत मार्गावर १५ डबा लोकल प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) आणि कल्याण – कसारा मार्गावर १५ डबाचे लोकलचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात येणार होते. मात्र हा प्रकल्प पुढे सरकलाच नाही. आता पुन्हा एकदा या प्रकल्पाला गती देण्याचा विचार मध्य रेल्वेकडून होत आहे.

पुन्हा एकदा १५ डबा लोकल प्रकल्पाचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून फेऱ्या वाढवणे, कल्याण – कसारा मार्गावर फलाटांची लांबी वाढवणे, त्यासाठी येणाऱ्या अडचणी इत्यादींची माहिती घेण्यात येत असल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सांगितले. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

१५ डबा लोकल चालवण्यात अडचणी काय

मध्य रेल्वेवर कल्याण यार्डाचे नूतनीकरण, कल्याण – कसारा तिसरी-चौथी मार्गिका, कल्याण – बदलापूर तिसरी – चौथी मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकलची संख्या आणि फेऱ्या वाढू शकेल, असे मध्य रेल्वेकडून आतापर्यंत वारंवार स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यावर अधिक भर देणे आणि सध्या कल्याणपर्यंत तरी १५ डबा लोकल चालविणे, किमान बदलापूर, अंबरनाथपर्यंत फलाटांची लांबी वाढविणे याबाबत लवकरच होणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकल

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट – विरार, डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल धावते. या लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेवेचा विस्तारही पश्चिम रेल्वेने केला आहे. याशिवाय अंधेरी – विरारदरम्यानचा प्रवास सुकर करण्यासाठी धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल चालविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार या दोन स्थानकांदरम्यान फलाटांची लांबी वाढविण्याबरोबरच अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या प्रकल्पाचे काम एप्रिल २०२१ मध्ये पूर्ण झाले आहे. १२ डबा लोकलला तीन डबे जोडून १५ डबा लोकलच्या २१ नोव्हेंबरपासून आणखी २६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १०६ वरून १३२ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button