देशातील शहरांत आणि ग्रामीण भागात टोमॅटो, बटाटे आणि कांद्याची किंमत वाढली
दरवाढीमुळे बिघडले किचन बजेट, सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री
मुंबई : देशात मान्सून सक्रिय झाला आहे. उत्तर भारताला आणि मध्य भारतात पावसाने दमदार हजेरी लावली. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतींवर दिसून येत आहे. भाजीपाल्याच्या किंमती वधारल्या आहेत. देशातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, कांदे आणि बटाट्याच्य किंमती वाढल्या आहेत. भाजीपाला, तांदळासह डाळींचे भाव वाढल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
असे आहेत भाव
यंदा तीव्र उन्हाळ्याने भाजीपाला उत्पादन घटले होते. तर आता मान्सूनमुळे भाजीपालाचे भाव वधारले आहेत. टोमॅटोचे कमाल भाव 130 रुपयांवर पोहचले. तर कांद्याची किंमत 90 रुपये किलो झाली. तर भाजीपाल्यासहीत इतर खाद्यान्नाच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किंमतींनी देशात शतक ठोकले आहे. तर इतर भाजीपाल्याने अर्धशतक पूर्ण केले आहे.
ग्राहक मंत्रालयाच्या साईटनुसार, 2 जुलै रोजी बटाटाच्या कमाल भाव 80 रुपये किलो, कांद्याचा कमाल भाव 90 रुपये किलो तर टोमॅटोचा कमाल भाव 130 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला होता. मान्सूनमुळे देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव 100 रुपयांच्या घरात पोहचला. तर सरासरी भाव 54.50 रुपये आहे. अंदमान निकोबार बेटावर टोमॅटोचा भाव सर्वाधिक आहे. कांदा काही शहरात 60 रुपये तर बटाटे 61.67 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
का महागला भाजीपाला
सरकारी आकडेवारीनुसार, मंगळवारी भाजीपाल्याचे दर सरासरीपेक्षा अधिक होते. उत्तर भारतात टोमॅटो महागला. तर कांदा 45 ते 50 रुपये किलो दराने विक्री होत होता. तर बटाट्याची किंमत पूर्वी 10 ते 12 रुपये किलो होती. तो भाव आता 40 रुपये किलोवर पोहचला. देशातील काही भागात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत.
मान्सून दाखल होताच कडाडले भाव
उष्णतेच्या लाटांमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले तर आता पावसामुळे भाजीपाल्यासह डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. बटाटे, टोमॅटो, कांदा, लसूण आणि इतर भाजीपाल्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आता मान्सून दाखल झाला आहे. पण वाहतुकीतील अडचण, साठवणुकीची समस्या आणि पावसामुळे भाजीपाला लवकर खराब होतो. आवक घटल्याने भाजीपाला महागला आहे.