मुंबईतील नगरसेवक संख्या वाढीचा वटहुकूम नगरविकास विभागाकडून जारी
![Ordinance to increase the number of corporators in Mumbai issued by the Urban Development Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/BMC-MUMBAI.jpg)
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर तसा वटहुकूम काढण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला होता. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असून आता नगरविकास विभागाकडून हा वटहुकूम जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील लोकसंख्या वाढल्याने प्रभाग संख्याही वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सध्या मुंबईची नगरसेवक संख्या २२७ असून ती आता ९ ने वाढून २३६ होणार आहे. यासंदर्भातील वटहुकूम काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे प्रलंबित होता. त्यास सोमवारी मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हा वटहुकूम नगरविकास विभागाने जारी केला आहे. लोकसंख्या वाढल्यानेच प्रभाग संख्या वाढविण्यात येत असल्याचे या वटहुकूमात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबईसह अन्य काही महापालिकेतील प्रभाग संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दिवाळीआधीच घेतला होता. त्यातील मुंबईवगळता इतरांच्या निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगेच मंजुरी दिली होती. पण मुंबईचा निर्णय प्रलंबित ठेवला होता. अखेर त्यास मंजुरी मिळाल्याने मुंबईची प्रभाग संख्या वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.