उद्या मुंबईत लसीचा केवळ दुसरा डोस मिळणार
![Only a second dose of the vaccine will be available in Mumbai tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/corona-vaccine.jpg)
मुंबई – कोरोनाला थोपविण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय असतानाही अद्यापही राज्यात लसीकरणाला ठीकठिकाणी ब्रेक मिळत आहे. मुंबईतही उद्या मर्यादित स्वरूपात लसीकरण होणार असून मुंबईतील सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर लसीचा केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे.
उद्या मुंबईतल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक केंद्रांवर लसीचा केवळ दुसरा डोस बाकी असलेल्यांचं लसीकरण पार पडणार आहे. 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. 1 सप्टेंबरपर्यंत 69 लाख 26 हजार मुंबईकरांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. 1 सप्टेंबरपर्यंत 25 लाख 17 हजार मुंबईकरांना दुसरा डोस मिळाला असून त्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे.
लसीचा दुसरा डोस घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणं आवश्यक आहे. याच अनुषंगानं सर्व शासकीय आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर उद्या हे विशेष सत्र पार पडणार आहे. ज्या नागरिकांच्या लसीच्या दुसऱ्या डोसची तारिख आली आहे त्यांनी या सत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.