ओमायक्रोनचा फटका ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळळा
![The stock market plunged, the Sensex plunged by a thousand points](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/shear.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असतानाच ओमायक्रोनचा धोकाही वाढत जात आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर होत असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण झाली. बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात एक टक्क्यापेक्षा जास्त घट होत तो 56,650 अंकांवर पोहचला होता. तर निफ्टीही 16.850 अंकांपर्यत खाली आला आहे.
देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याचा फटका शेअर बाजारावर बसत आहे. आज मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीची सुरुवात लाल निशाणीने झाली. यामुळे आशियाई बाजारातही मोठ घसरण दिसून आली. शुक्रवारी निर्देशाकांत 190 अंकांची घसरण होत तो 57,124.31 अकांपर्यंत खाली आला होता. तर निफ्टीत 68.85 अंकांची घसरण होत तो 17,003.75 अकांपर्यंत खाली आला होता. गेल्या सोमवारीही बाजाराची सुरुवात घसरणीने झाली होती. गेल्या आठवड्यात तीन दिवस काही प्रमाणात तेजी होती. मात्र, दोन दिवस झालेल्या घसरणीने बाजारावर दबाव दिसत होता.
दरम्यान, ओमायक्रॉनच्या प्रभावामुळे जपानच्या बाजारात 0.20 टक्के, दक्षिण कोरियाचा बाजार 0.11 टक्के तर शांघाय बाजारात 0.40 टक्क्यांची घसरण झाली आहे.आज निफ्टीमधील वधारणाऱ्या स्टॉकची संख्या फक्त 7 असून 43 स्टॉक घसरले आहेत. निफ्टीमध्ये फार्मा शेअर्समध्ये तेजी दिसत आहे आणि औषध कंपनी सिप्लाचा शेअर दर 1.5 टक्के वधारला.
त्याशिवाय, सन फार्मा, पॉवर ग्रीड, एनटीपीसीच्या शेअर दरात वाढ झाली.
सर्वाधिक घसरण झालेले शेअर
शेअर बाजार सुरू होताच घसरण नोंदवण्यात आली. इंडसइंड बँक 4.71 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे आणि बजाज फायनान्स 1.79 टक्क्यांनी घसरला आहे. बजाज फिनसर्व्ह 1.46 टक्क्यांनी आणि आयशर मोटर्स 1.18 टक्क्यांनी घसरला आहे.