
मुंबई : मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून गृह विभागाने त्याऐवजी सहपोलिस आयुक्त (गुप्तवार्ता) असे नवे पद निर्माण केले. यासंदर्भात शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला. मुंबई पोलिस दलातील हे सहावे सहआयुक्तपद असेल.
देवेन भारती यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने विशेष पोलिस आयुक्तपद रिक्त झाले होते. आता या नव्या पदाच्या निर्मितीमुळे विशेष आयुक्तपद आपोआप रद्द झाले. या नव्या पदावर कोणाची वर्णी लागते, या पदाच्या अधिपत्याखालील विभागाची रचना कशी असेल, त्यासाठी कोणते संरचनात्मक बदल होतील, याबाबत पोलिस दलात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – ७ जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
शहर, संवेदनशील आस्थापना, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून गोपनीय माहिती मिळवणे आणि त्या माहितीचे सूक्ष्म पर्यवेक्षण करणे, या हेतूने या पदाच्या निर्मितीबाबत शासन विचाराधीन होते.
महिला अधिकाऱ्याचे नाव चर्चेत
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहपोलिस आयुक्त (गुप्तवार्ता) या पदासाठी राज्य पोलिस दलात महानिरीक्षक श्रेणीतील महिला अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आहे. या विभागासाठी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी कक्ष (एटीसी), विशेष शाखेतील काही कार्यालये, सुरक्षा व संरक्षण विभागातील काही मनुष्यबळ जोडले जाईल, असेही समजते.