७ जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. खरंतर जुनच्या पहिल्या आठवड्यात नैऋत्य मोसमी वारे हे केरळमध्ये दाखल होत असतात. मात्र, यंदा अपेक्षेपेक्षा लवकर मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रात यंदा लवकर मोसमी पाऊसाला सुरूवात होणार आहे. साधारण ७ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र, ओडिशा व ईशान्य भारतातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात पश्चिम किनाऱ्यावर सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – राज्यातील भटक्या विमुक्तांना आता कोठेही मिळणार रेशनिंग; शेतीसाठी जमीनही मिळणार?
तिसऱ्या आठवड्यात कर्नाटक ईशान्य किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. किंबहुना वायव्य भारत, तमिळनाडू वगळता देशातील बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. त्यानंतरच्या आठवड्यात पूर्व भारत, मध्य भारत, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक केरळच्या किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत १६ मे आणि १७ मे या दोन विजांच्या कडकडाटसह पावसाची दिसून येणार आहे. तसेच मुबंई उपनगरांमध्ये देखील पाऊसाच्या कोसळधारा बरसणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे.