वाकोला येथील १०० वर्षे जुन्या हनुमान मंदिराला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली; पाडण्यास भाविकांचा विरोध
![Mumbai Municipal Corporation issues notice to 100 year old Hanuman Temple at Wakola; Devotees oppose demolition](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-20-at-11.00.41-AM.jpeg)
मुंबई | रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या सांताक्रूझ पूर्वच्या वाकोला येथील १०० वर्षे जुन्या हनुमान मंदिराला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यानुसार महापालिका मंदिर पाडणार आहे. मात्र भाविकांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. हे प्राचीन मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी त्यांनी ‘मंदिर बचाव’ अभियान सुरू केले आहे. पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मंदिर हटवण्यास विरोध केला आहे.
सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला परिसरात १०० वर्षांचे जुने हनुमान मंदिर आहे. रस्ता रुंदीकरणात त्याचा अडथळा येत असल्यामुळे मुंबई महापालिकेने मंदिर हटवण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्याला भाविकांनी विरोध केला आहे. भाजपचे प्रवक्ते अजय सिंह यांनी या मंदिरावर कारवाई करू नये अशा मागणीचे पत्र मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पाठवले आहे. त्यांनी मंदिर बचाव अभियान हाती घेतले आहे. मंदिर पाडण्याऐवजी दुसरा पर्याय निवडावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पालिकेने पाठवलेल्या नोटिसीनंतर शनिवारी सायंकाळी मंदिरात जमलेल्या भाविकांनी महाआरती करून पालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त केला. त्यामुळे आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर वाकोल्यात हनुमान मंदिराचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग हेही महाआरतीत सहभागी झाले होते. त्यांनीही मंदिर हटवण्यात विरोध केला आहे.