‘मुंबई सुशोभिकरण प्रकल्प’:आणखी एका विभागाची निविदा वादात
!['Mumbai beautification project': Yet another department's tender in controversy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/bmc-1-1-780x470.jpg)
मुंबई | मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाला आधीच विलंब झालेला असताना या कामांसाठी मागविलेली आणखी एका विभागाची निविदा वादात सापडली आहे. यापूर्वी अंधेरी, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, वडाळा येथील कामाच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यापाठोपाठ आता भायखळा येथेही सुशोभिकरण प्रकल्पाच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. १६ प्रकारच्या सर्व कामांसाठी वेगवेगळ्या निविदा न काढता एका विशिष्ट कंत्राटदाराला काम देण्यासाठी एकच निविदा मागवण्यात आली आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी व ही निविदा रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण महानगराच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असला तरी या प्रकल्पाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या प्रकल्पातील सुशोभिकरणाची कामे अद्याप निविदेच्या पातळीवरच आहेत. त्यातच अनेक विभागांच्या निविदा वादात सापडल्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे. यापूर्वी मालाड, अंधेरी, वडाळा येथील सुशोभिकरणाच्या कामांच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच बोरिवली, कांदिवली, दहिसर येथील कामांच्या निविदा प्रक्रियाही वादात सापडल्या होत्या. त्यापाठोपाठ आता भायखळा परिसराचा समावेश असलेल्या ई विभागाची निविदा प्रक्रियाही वादात सापडली आहे. भायखळा येथील माजी नगरसेवक व शिवसेना उपनेते मनोज जामसूतकर यांनी याप्रकरणी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
या प्रकल्पांतर्गत वाहतूक बेटाचे सुशोभिकरण, पुलाखालील जागा सुशोभित करणे, पदपथाचे काँक्रिटीकरण, रस्त्यावरील दिवे, भितीची रंगरंगोटी अशी १६ प्रकारची कामे केली जाणार आहेत. त्याकरीता प्रत्येक विभागाला ३० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. मात्र या सर्व कामांच्या स्वतंत्र निविदा काढण्याचा नियम असताना त्यासाठी एकच निविदा ई विभागाने मागवली आहे. त्यास जामसूतकर यांनी आक्षेप घेतला आहे. अशाच पद्धतीने इतर विभागातही निविदा काढल्या जात असतील तर त्याची चौकशी करावी व अशा निविदा रद्द कराव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पडद्यामागचा कलाकार कोण
सोळा कामांसाठी एकच निविदा मागवण्याकरीता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणी दबाव टाकत आहे, असा सवाल जामसूतकर यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणा एका विशिष्ट कंत्राटदाराला काम देता यावे याकरीता विशिष्ट अटी घालण्यात आल्या असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. भायखळा विभागात माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे वर्चस्व असून जामसूतकर यांनी जाधव यांचे नाव न घेता यापूर्वी भायखळा विभागात कशाप्रकारे स्पर्धेतील कंत्राटदारांवर दबाव टाकला जात होता त्याचे उदाहरण दिले.