कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आले धावून; उचललं हे मोठं पाऊल!
![Mukesh Ambani came running to help the coroners; This is a big step!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/ambani-oxygen-.png)
मुंबई – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यात ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती केली होती. आता देशभरात रूग्णसंख्या वाढत असल्यानं सर्वत्र ऑक्सिजनची गरज भासत आहे. यातच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देशाच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि उद्योगपती मुकेश अंबानी कोरोना बाधितांच्या मदतीसाठी मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिफायनरीजमधून रुग्णालयांना विनाशुल्क ऑक्सिजन दिलं जाणार आहे. महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता रिलायन्स रिफायनरीमधून राज्याला 100 टन ऑक्सिजन मिळणार आहे.
मुकेश अंबानी यांनी त्यांच्या तेल कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानींच्या गुजरातमधील जामनगरमध्ये दोन रिफायनरी आहे. यात थोडेसे बदल केल्यानंतर या ठिकाणी वापरला जाणारा औद्योगिक ऑक्सिजन हा मेडिकलसाठी उपयुक्त ऑक्सिजन म्हणून वापरला जाऊ शकतो. हा ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यात पुरवठा केला जाऊ शकतो.
दरम्यान, रिलायन्सच्या जामनगर कारखान्यातील ऑक्सिजन सिलेंडर ट्रकमध्ये भरुन पुरवठ्यासाठी तयार आहे. या रिफायनगरीतील 100 टन ऑक्सिजन विनामूल्य महाराष्ट्र राज्यात वितरित केले जाईल. प्रत्येक कंपनीला व्यवसायात झालेल्या नफ्यापैकी 2% सीएसआर फंडात पैसा द्यावा लागतो. यात कंपन्या सामाजिक क्षेत्रात मदत पुरवत असतात. उद्योगपती मुकेश अंबानी यांचं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद मानायला हवं.