प्रवासी वाढविण्यासाठी मोनो रेलची धाव आता महालक्ष्मीपर्यंत
![Mono rail runs now to Mahalakshmi to increase the number of passengers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/mv-mono-rail.jpg)
मुंबई | मोनो रेलला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी तसेच मोनोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेलच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संत गाडगे महाराज चौक ते मेट्रो ३ मार्गातील महालक्ष्मी मेट्रो स्थानक असे ७०० मीटपर्यंत विस्तारीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) करण्यात येणार आहे. भूसंपादनासह इतर कामांसाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १५६.८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक असा २०-२१ किमीचा मोनोरेल मार्ग आहे. चेंबूर ते वडाळा असा पहिला टप्पा २०१४ तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक टप्पा २०१९ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. वाहतूक व्यवस्थेचा अत्याधुनिक असा पर्याय असल्याने मोनो रेलला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा एमएमआरडीएकडून हा मार्ग सुरू होण्याआधीपासून करण्यात येत होता. पण प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. प्रवासी संख्या खूपच कमी असल्याने दररोज एमएमआरडीएला लाखोंचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
मोनो रेलला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून आता मोनो रेलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनो रेल मेट्रो ३ शी जोडण्याचे नियोजन करण्यात आले. या विस्तारीकरणास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष विस्तारीकरण मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात १५६.८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मोनो रेलच्या भूसंपादनासह इतर कामांसाठी ही तरतूद करण्यात आल्याचे यासंबंधीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोनोरेलचा संत गाडगेबाबा महाराज चौक ते महालक्ष्मी मेट्रो ३ स्थानक असा विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
– एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए