मोदींनी ट्रोलिंगसाठी ठेवलेल्या मंत्र्यांची अधिकृत घोषणा करावी; शिवसेनेचा खोचक टोला
![Modi should make an official announcement of the ministers appointed for trolling; Shiv Sena's sharp tola](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/modi-1.jpg)
मुंबई |
केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकार यांच्यात पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रत्युत्तर दिलं. या राजकीय खडाजंगीवरून आता शिवसेनेनं थेट ट्रोलिंग मंत्री गटाला बळ देण्यासाठी मोदींनी तशी अधिकृत घोषणा करावी असा टोला लगावला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सगळीकडून रेमडेसिवीरची ओरड होत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर देऊ नका, असं केंद्राने रेमडेसिवीर औषध उत्पादक कंपन्यांना सांगितल्याचा दावा केला होता. त्यावर पीयूष गोयल यांनी लागलीच ट्विट करत संताप व्यक्त केला होता. गोयल यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावरून शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींना टोला लगावला आहे. “राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ट्रोलिंग मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गट पुन्हा महाराष्ट्राविरोधात किंचाळायला लागला आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतंय की ट्रोलिंग मंत्री गटाला सशक्त करण्यासाठी माननिय पंतप्रधानांनी तशी अधिकृत घोषणाच करायला हवी. त्यामुळे कमीतकमी त्यांच्या जगण्याच्या उद्दिष्टाची तरी जाणीव होईल,” असं म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदी आणि पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.
The screaming squad against Maharashtra is out again, led by troll mantri who represents Maharashtra in the RS.
I sincerely think there should be a formal announcement by Hon. PM of the Empowered GoTM(group of troll Mantris)
At least will give them a sense of purpose in life.— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) April 17, 2021
रेमडेसिवीरच्या वादात कोण काय म्हणाले?
“१६ निर्यातदारांकडे रेमडेसिवीरच्या २० लाख डोज आहेत. पण त्यांच्याकडे मागणी केली असता महाराष्ट्रात पुरवठा करू नये, तसे केल्यास परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी केंद्राने त्यांना दिली आहे,” आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. मलिक यांच्या आरोपाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिलं. “करोनाच्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रयत्न करीत असताना भ्रष्ट आणि स्वार्थी महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातील जनता सारे भोगत आहे. अशा कठीण परिस्थितीत राजकारण करण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारावी,” असं गोयल म्हणाले. तर काँग्रेसनंही यावरून मोदी सरकारवर टीका केली. “मोदी सरकारनं महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करू नये असं धमकावणं हे अत्यंत क्रूर आहे. मोदी सरकारचं हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे,” काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
वाचा- #Covid-19: पवित्र रमजान महिना साजरा करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आदेश..!