राज ठाकरे यांना मोदी सरकार विशेष सुरक्षा पुरविण्याची शक्यता
![Modi government likely to provide special security to Raj Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Breaking-News-राज-ठाकरे-यांना-मोदी-सरकार-विशेष-सुरक्षा.jpg)
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारला ३ मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं आहे. जर ईदपर्यंत मशिदीवरचे भोंगे हटले नाहीत तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. ज्यानंतर पीएफआय सारख्या संघटनांकडून राज ठाकरेंना धमक्या आल्या. राज ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याचं लक्षात घेता, केंद्र सरकार त्यांना विशेष सुरक्षा पुरवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसेच्या पाडवा मेळाव्यात तसंच ठाण्यातल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी आपल्या जहाल हिंदुत्ववादी भूमिकेचं दर्शन साऱ्या भारताला घडवलं. विशेषत: मशिदीवरील भोंग्यावरुन घेतलेल्या आक्रमक भूमिकेने आणि अयोध्या दौऱ्याच्या घोषणेने राज ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे, असा निष्कर्ष राजकीय जाणकारांनी काढला. राज ठाकरेंच्या याच जहाल हिंदुत्वाला भाजप खतपाणी घालत आहे का?, असा प्रश्न विचारला जातोय. कारण याच सगळ्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरविण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी तशी माहिती दिली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर पीएफआय संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. छेडोगे तो छोडेंगे नहीं, म्हणत पीएफआय संघटनेने राज ठाकरेंविरोधात दंड थोपटले आहेत. राज ठाकरे आणि पीएफआय मधील संघर्ष पाहता तसंच त्यांना आलेल्या धमक्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज ठाकरेंना सुरक्षा पुरविण्याचा विचार केला असल्याचं कळतंय.
राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मनसेतील सहकाऱ्यांंसह ते प्रभू रामाचं दर्शन घेतील. यावेळी त्यांना उत्तर प्रदेश सरकार तसंच केंद्र सरकार विशेष सुरक्षा पुरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात विशेष सुरक्षा तैनात असेल, अशी माहिती कळत आहे.
भाजप हिंदुत्ववादी पक्ष म्हणून देशभरात ओळखला जातो. राज ठाकरेंनीही मराठी कार्ड थोडंसं बाजूला सारुन जहाल आणि आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी होत आहेत. चर्चा झडत आहेत. एकंदरितच राज ठाकरे यांच्या जहाल हिंदुत्वाला भाजप खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.