मनसे बॅकफूटवर, राज्यभरात होणारी महाआरती रद्द
![Maha Aarti canceled across the state on MNS backfoot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Maha-Aarti-canceled-across-the-state-on-MNS-backfoot.jpg)
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर आता मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर राज्यभर होणाऱ्या महाआरतीचा निर्णयाला स्थगित देत आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर राज्यातील प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण उद्या ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे मसने कार्यकर्त्यांनी उद्या ऐवजी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्याचं महाआरतीचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे.
दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ ऐवजी ४ मेची मुदत दिली आहे. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र ४ मेपासून ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पत आवाजात हनुमान चालीसा म्हणा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. सरळ भाषेत ‘त्यांना’ कळत नसेल तर एकदा होऊनच जाऊ द्या, असा आक्रमक सूरही त्यांनी लावला.