‘शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजावेत यासाठी साहित्य संमेलने’; उद्योग मंत्री उदय सामंत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-14-2-780x470.jpg)
मुंबई: ग्रंथालयाकडे युवकांचा ओढा वाढविण्यासाठी ग्रंथ चळवळीने प्रयत्न करावेत. शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजण्यासाठी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन यावर्षी राज्य शासनामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२४ ‘ कार्यक्रमात मंत्री सामंत बोलत होते.
मोबाईलबरोबर पुस्तक ऐकण्याची सुविधा आहे त्याचाही विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा. मराठी संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके वाचून आत्मचिंतन करा. महाराष्ट्राची संस्कृती कशी घडली हे वाचा, ग्रंथ आणि ग्रंथालयाबद्दल अभिमान बाळगा. जिल्हा ग्रंथालयाने ग्रंथोत्सव भरविताना तो अधिक व्यापक स्वरुपात होईल असे नियोजन करावे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
इंग्रजी आणि हिंदी यायलाच हवे, मात्र मराठीचा विसर पडू नये. मराठी भाषेकडे आदराने बघावे, विश्व मराठी संमेलनामध्ये पुस्तक आदानप्रदानाचा उपक्रम घेण्यात आला. तो उपक्रम प्रत्येक ग्रंथालयाने राबवायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व ग्रंथालय डिजिटल करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर उभारणार असून रायगड जिल्ह्यातील गावात ही शिवाजी महाराजांचा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा उभा करण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यटन विकास वाढीला चालना मिळेल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री गाडेकर यांनी वाचन संस्कृतीच्या विकासासाठी ग्रंथालय संचालनालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. आभार रवींद्र गावडे यांनी मानले तर सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले.
तत्पूर्वी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू.) मनपा अग्निशमन केंद्र, दादर-रणजित बुधकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज चौक, एस. एस. वाघ मार्ग-महात्मा गांधी चौक- महात्मा फुले रोड – शाहीर मधू कडू चौक या मार्गावरुन लेझिम आणि ढोलताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली.