रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकलचा विचार करू – महापौर
![Central Railway's Sunday megablock; Many local, mail, express canceled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/415154-mumbailocal.jpg)
मुंबई – दैनंदिन रुग्णवाढीत दिवसागणिक काहीशी घट होत असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. मात्र महागाईमुळे नोकरी गाठण्यासाठी लोकल कधी सुरू होणार याची वाट सर्वसामान्य जनता आतुरतेने पाहतेय. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘रुग्णसंख्या कमी झाली तर लोकलचा विचार करू. पण लोकांच्या जीवावर बेतेल, असे काही करणार नाही’, असे म्हटले आहे.
किशोरी पेडणेकर या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, ‘मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे. आम्हाला यश येत आहे. मात्र अद्यापही धोका कमी झालेला नाही. दुसरी लाट थोपविली जात असली तरी तिसरी लाट अधिक धोकादायक आहे, असे तज्ज्ञ म्हणत आहेत. परिणामी मुंबई महापालिका लसीकरण आणखी वेगाने करत असून, आता लोकल सुरु करण्याचा विचार करायचा झाला तर आजही पाचशे ते सहाशे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली तर लोकलचा विचार करू. पण लोकांच्या जीवावर बेतेल, असे काही करणार नाही.’