“आदित्य ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांना कायद्याप्रमाणे उत्तर देऊ”, अनिल परबांचा सोमय्यांवर पलटवार
!["Let's answer 'those' allegations against Aditya Thackeray according to law", Anil Parba hits back at Somayya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Anil-Parab-reaction-to-Kirit-Somaiya-allegations.jpg)
मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. “उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या”, असे विधान सोमय्या यांनी केले आहे. यावर शिवसेना नेते अनिल परबांनी प्रत्युत्तर दिले आहे. “किरीट सोमय्या फक्त पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे आणि पक्षाचे काय ठरले हे आम्हाला माहित नाही. आदित्य ठाकरेंवरील आरोपांबाबत कायद्याप्रमाणे आम्ही उत्तर देऊ”, असे परब म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंना ठाकरे कुटुंबीयांची संपत्ती मिळू शकते, पण बाळासाहेबांचा वारसा नाही, असे वक्तव्य शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. बाळासाहेबांचा वारस कोण हे जनता ठरवणार, असे सांगत परब यांनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे. गुलाबराव पाटलांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असे आव्हानही परब यांनी दिले आहे. दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा आहे. त्यामुळे हा मेळावा उद्धव ठाकरेच घेणार, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना ठासून सांगितले. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला शिवसेनेकडून अंधेरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी इतर पक्षांना आवाहन करू, असे अनिल परब म्हणाले आहेत.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेल्या अनेक आठवड्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही तुरुंगात जातील, असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे. मुंबईतील मढ येथील स्टुडिओ उभारणीत १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंवर किरीट सोमय्यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. या स्टुडिओ घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्रालयाने बेकायदेशीरपणे १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, हे लवकरच सिद्ध होईल, असे सोमय्या म्हणाले आहेत.