राज्यात करोनाच्या एक्सई व्हेरियंटचा शिरकाव; केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
![Infiltration of XE variant of Corona in the state; Central Government directs states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Infiltration-of-XE-variant-of-Corona-in-the-state-Central-Government-directs-states.jpg)
मुंबई|करोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सई’ आढळल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये करोना संसर्ग वाढत आहे, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही देण्यात आले. संसर्ग वाढण्यामागील कारणांसह तेथील लसीकरणाचे प्रमाण किती आहे, यावर अधिक काटेकोर लक्ष देण्याचेही सूचित करण्यात आले.
राज्यांनी निर्बंध सैल केल्यानंतर राज्यांतर्गत दळणवळण, तसेच इतर व्यवहार अधिक गतिमान झाले. आर्थिक घडी स्थिरस्थावर करत असताना करोना संसर्ग वाढू नये, याकडे अधिक काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे, असे निर्देश केंद्र सरकारने दिल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. ८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ७९४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच संक्रमण दर मागील आठवड्यात ०.३९ टक्के होता. तो ०.४३ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे संसर्ग वाढणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वाढीमागील कारणांचा नेमका शोध घेण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेने दिले आहेत.
मुंबईत घट; पुणे, बुलडाण्यात वाढ
२४ ते ३० मार्च या कालावधीमध्ये मुंबईमध्ये २९२ रुग्णसंख्येची नोंद झाली होती. त्यात घट होऊन ३१ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये ती २८३ इतकी नोंदवण्यात आली. टक्केवारीमध्ये मुंबईतील नवीन रुग्णांची संख्या ३.०८ने कमी झाली. मात्र पुणे आणि बुलडाणा येथे रुग्णसंख्येत अनुक्रमे १३.४९ आणि ४६.४३ टक्क्यांची वाढ झालेली दिसते.