तिसऱ्या लाटेत २९१ कैद्यांना, तर ५६ कर्मचाऱ्यांना संसर्ग; करोना चाचण्यांच्या संख्येत वाढ
![In the third wave, 291 prisoners and 56 staff were infected; Increase in the number of corona tests](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/corona-patient-1-2.jpg)
मुंबई | करोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यातील तुरुंगामधील २९१ कैद्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यासोबत ५७ तुरुंग कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये तुरुंगातील करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तुरुंगात आलेल्या कैद्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आहे. तुरुंगात दाखल करण्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना विलगीकरणात अथवा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई व ठाणे तुरुंगात प्रत्येकी ७ कैद्यांना तिसऱ्या लाटेत करोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ भायखळा तुरुंगातील सहा कैदी करोनाबाधित झाले आहेत. त्यात एका महिला कैद्याचा समावेश आहे. कल्याणमध्ये पाच कैद्यांना करोनाची बाधा झाली होती. येरवडा मध्यवर्ती तुरुंगातील सर्वाधिक म्हणजे ५१ कैद्यांना तिसऱ्या लाटेत करोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर येथे ३०, सातारा येथे १५, अहमदनगर येथे ३९, नागपूरमध्ये २०, औरंबादमध्ये ११, अकोलामध्ये १८ व लातूरमधील आठ कैदी करोनाबाधित झाले आहेत.
त्याशिवाय ५७ तुरुंग कर्मचाऱ्यांनाही तिसऱ्या लाटेत करोनाची बाधा झाली आहे. त्यात कोल्हापूरमधील १३, ठाण्यातील दोन, तळोजातील एक, साताऱ्यातील तीन, तर नाशिकमधील ४ जणांचा समावेश आहे.
राज्यातील तुरुंगामध्ये पहिला करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर एप्रिल २०२० मध्ये करोनाबाधित कैद्यांची संख्या वाढली होती. त्यामुले तुरुंगातील कैद्यांच्या चाचणीत वाढ करण्यात आली होती. आतापर्यंत एक लाख २३ हजार ४८२ चाचण्या केल्या आहेत. त्यात आतापर्यंत पाच हजार २२७ कैद्यांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली आहे. त्यातील चार हजार ९२३ कैद्यांनी करोनावर मात केली आहे. तर १३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.