येत्या ४ दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात होणार मोठी घट
मुंबई | प्रतिनिधी
गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशात सर्वत्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातील दोन आठवडे संपल्यानंतरही देशात अपेक्षित थंडी पडली नाही. पण आता पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबसह वायव्य भारतात थंडीची लाट आली आहे.
येत्या चार ते पाच दिवसांत वायव्य भारतात थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हवामान खात्याने इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातून थंडी गायब झाल्यानंतर, पंजाबसह मध्य महाराष्ट्र आणि बहुतांशी गुजरातमध्ये पुन्हा एकदा थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसात keur ठिकाणी किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअस तापमानाची घट होणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील जाणवणार आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील तापमानात देखील जवळपास २ ते ३ अंश सेल्सिअस तापमानाची घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भात देखील थंडीची हुडहुडी जाणवू लागली असून याठिकाणी तापमानाचा पारा १२ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे विदर्भकरांना कुडकुडणारी थंडीची अनुभुती येत आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. गेली दोन आठवडे कोरड्या हवामानाची नोंद झाल्यानंतर, विदर्भात थंडीला सुरुवात झाली आहे.





