कोणी माथेफिरू ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…; राऊतांनी उडवली खिल्ली
![If someone is walking around with tomato sauce under their head ...; Raut mocked](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/If-someone-is-walking-around-with-tomato-sauce-under-their-head-...-Raut-mocked.jpg)
मुंबई |पोलिसांना हाताशी धरून राज्यात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते भाजप नेत्यांवर हल्ले करत असल्याचा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. ‘विरोधकांवर हल्ले झाले म्हणजे काय झालं आहे? कोणी एखादा माथेफिरू ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजप नेत्यांवर चौफेर हल्लाबोल केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या भाजपचं नेतृत्व करतात त्या पक्षाच्या नेते लोकशाहीबद्दल प्रवचन देत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा होती आणि उबळही होती. मात्र तरीही सत्तेत न आल्याने जी अस्वस्थता आहे, त्यातून अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत,’ असं प्रत्युत्तर राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
उत्तर प्रदेशातील घटनांवरून टीकास्त्र
महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ओळखतात त्यांना कळेल की महाराष्ट्रासारखं लोकशाहीवादी सरकार देशात नसेल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन महिन्यांत १७ खून आणि बलात्कार झाले आहेत. आसाम सरकारने गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली. कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्वीट केलं होतं. मेवाणी यांना जामीन देण्यात आल्यानंतर पुन्हा अटक करण्यात आली, हे कोणतं लक्षण आहे? यावरही देवेंद्र फडणवीस यांनी बोललं पाहिजे,’ असा पलटवार राऊत यांनी केला.